आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू, विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश


मुंबईः  विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी देणारी आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मध्यंतरी ही योजना बंद करण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येत होता. ही योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ आणि राज्यभरातील विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनांनी लढा उभारला होता. अखेर त्या लढ्याला यश आले असून ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज संस्था आणि इतर शासकीय आस्थापनेतील कर्मचाऱ्यांना १२ आणि १४ वर्षांच्या नियमित सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती योजना लागू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही ही योजना चौथ्या आणि पाचव्या वेतन आयोगाच्या वेळी लागू करण्यात आली. परंतु सहाव्या वेतन आयोगाच्या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने त्यात उणीव ठेवली होती.

 उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या १५ फेब्रुवारी २०११ व १६ फेब्रुवारी २०१९ च्या निर्णयानुसार राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ही योजना जशीच्या तशी लागू केली खरी, परंतु या योजनेला वित्त विभागाची पूर्वमान्यताच घेतली नाही.

 नेमके हेच कारण पुढे करून राज्य सरकारने ही योजना पाच वर्षांपूर्वी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकेत्तर कर्मचारी संतप्त झाले होते.  ही योजना बंद झाल्यामुळे अनेकांचे पदोन्नतीचे स्वप्न भंगले होते.

आश्वासित प्रगती योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील अकृषि विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी २३ फेब्रुवारी २०२३ पासून राज्यभर कामबंद आंदोलन सुरू केले होते.

ऐन बारावीच्या परीक्षेच्या काळात हे आंदोलन सुरू करण्यात आल्यामुळे त्याचा फटका या परीक्षेच्या आयोजनाला बसला होता. राज्य सरकारने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले होते. अखेर ही आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *