‘वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू’ परभणीतील महायुतीचे महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य, आंबेडकरी संघटनांकडून निषेध


परभणीः वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटनाच बदलून टाकू, असे वक्तव्य परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केल्यामुळे आंबेडकरी संघटनांकडून त्यांचा जोरदार निषेध केला जात आहे. एक वृत्तवाहिनीशी बोलताना जानकरांनी दोन दिवसांपूर्वी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत जानकरांना हे वक्तव्य चांगलेच महागात पडण्याची चिनेहे दिसू लागली आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. या गाठीभेटीदरम्यान दोन दिवसांपूर्वी ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्यावेळी मराठा समाजाचा एक तरूण त्या ठिकाणी आला आणि त्या तरूणाने महादेव जानकरांना मराठा आरक्षाबाबत विचारले.

हेही वाचाः स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेणाऱ्या महादेव जानकरांची संपत्ती किती?, आकडा वाचून तुम्हीही म्हणाल अशी फकिरी आपल्याही वाट्याला यावी!

जानकर यांनी त्या युवकाला मराठा आरक्षण देण्यासंबंधी माझी भूमिका ठाम आहे. मराठा समाजाला सध्या जे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे, त्यासाठीदेखील मी प्रयत्न केले असल्याचे सांगितले. त्यावर त्या मराठा तरूणाने हे दहा टक्के आरक्षण टिकणार नही. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आणि यासाठी तुम्ही प्रयत्न करा, असे सांगितले.

त्या मराठा तरूणाला शांत करत महादेव जानकरांनी मी मराठा आरक्षणासाठी शेटवच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार आहे. आता मी खासदार होऊन दिल्लीत जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आरक्षणाचा निर्णय घेण्यास भाग पाडेल, असे सांगितले. वेळप्रसंगी राज्यघटनेत बदल करावा लागला तरी आपण बदल करू पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे जानकर म्हणाले.

महादेव जानकरांचा त्या युवकाशी बातचित करतानाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘वेळ पडल्यास आपण राज्यघटनाच बदलून टाकू’ या महादेव जानकरांच्या वक्तव्यावरून आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यघटना बदलण्याची भाषा करणाऱ्या जानकरांचा आंबेडकरी संघटनांकडून निषेधही नोंदवण्यात येत आहे. सोशल मीडियावर आंबेडकरी संघटनांकडून महादेव जानकरांवर टिकेची झोड उठली आहे.

एकीकडे दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जानकरांचा निषेध होत असतानाच आज सकाळी भदन्त मोदीतानंद यांच्या नेतृत्वाखाली विविध आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदन दिल्यानंतर आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ जानकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

गरज पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलून टाकू, असे वक्तव्य जाणीवपूर्वक करून महादेव जानकरांनी त्यांच्या मनुवादी विचारसरणीचा परिचय दिला आहे. ही बाब संविधानप्रेमी कदापिही खपवून घेणार नाहीत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंबेडकरी समुदायात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे, असे आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भदन्त मोदीतानंद, नागेश सोनपसारे, आशिष वाकोडे, अर्जुन पंडित, संजय सारणीकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!