मुंबई: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात २९९ उमेदवारांचे अर्ज पात्र असून त्यातील काही उमेदवारांनी माघार घेतल्याने २०४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयातील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सहसचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक १९ एप्रिल रोजी तर दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघामध्ये २६ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशनपत्रे सादर करण्याचा शेवटची तारीख ४ एप्रिल होती.
कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार?
- बुलढाणा-२१
- अकोला-१५
- अमरावती-३७
- वर्धा-२४
- यवतमाळ-वाशिम-१७
- हिंगोली-३३
- नांदेड-२३
- परभणी-३४
मतदारसंघनिहाय मतदारांची संख्या अशी
मतदारसंघ | पुरूष मतदार | महिला मतदार | एकूण मतदार |
बुलढाणा | ९,३३,१७३ | ८,४९,५०३ | १७,८२,७०० |
अकोला | ९,७७,५०० | ९,१३,२६९ | १८,९०,८१४ |
अमरावती | ९,४४,२१३ | ८,९१,७८० | १८,३६,०७८ |
वर्धा | ८,५८,४३९ | ८,२४,३१८ | १६,८२,७७१ |
यवतमाळ-वाशिम | १०,०२,४०० | ९,३८,४५२ | १९,४०,९१६ |
हिंगोली | ९,४६,६७४ | ८,७१,०३५ | १८,१७,७३४ |
नांदेड | ९,५५,०८४ | ८,९६,६१७ | १८,५१,८४३ |
परभणी | ११,०३,८९१ | १०,१९,१३२ | २१,२३,०५६ |
एकूण मतदार | ७७,२१,३७४ | ५३,९९,०५७ | १,४९,२५,९१२ |
तिसऱ्या टप्प्यात ११ मतदारसंघात मतदान
तिसऱ्या टप्प्यात कोकण विभागातील २, पुणे विभागातील ७ व औेरंगाबाद विभागातील २ अशा एकूण ११ लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी १२ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असून १९ एप्रिल रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी २० एप्रिल रोजी होईल तर २२ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील.
३८ कोटींची रोख रक्कम, ३० लाख लिटर दारू जप्त
राज्यात १ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातू इत्यादींची जप्ती करण्यात आली. यामध्ये ३८ कोटींची रोख रक्कम, २४.२६ कोटी रुपयांची ३० लाख २ हजार ७८१ लिटर दारु, २०७.४५ कोटींचे १० लाख ५३ हजार ५४५ ग्रॅम ड्रग्ज, ५५.१० कोटींचे २ लाख ७५ हजार ८३१ ग्रॅम मौल्यवान धातू, ४२ लाखांचे ४ हजार २७२ फ्रिबीज, ७२.८५ कोटींचे इतर साहित्य असे एकूण ३९८.२० कोटींची जप्ती करण्यात आली आहे.
आचारसंहिता भंगाच्या १९०० तक्रारी
१६ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत राज्यभरात सीव्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या १९०० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ९९ टक्के तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच या कालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील १४ हजार ६२३ तक्रारीपैकी १४ हजार ३३७ निकाली काढण्यात आलेल्या आहेत.