
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पायाभूत सुविधा आणि पूर्णवेळ अध्यापकांची नियुक्ती नसल्याचे कारण देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांवर एकतर्फी प्रवेशबंदी लादल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेन वनातील मिलिंद महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांचा इतिहास आणि लौकिकच धोक्यात आला आहे. त्यामुळे मराठवाडा- विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून उच्च शिक्षणासाठी नागसेनवनात येणाऱ्या सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांची पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधीच हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संधी हुकवण्यासाठीच तांत्रिक आणि प्रशासकीय बाबी लक्षात न घेताच विद्यापीठ प्रशासनाने हेतुतः ही प्रवेशबंदी लादली आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
निजाम स्टेटमध्ये पिचल्यामुळे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्याही मागास राहिलेल्या मराठवाड्यातील तरूणांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली करून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन औरंगाबादेत २१६ एकर परिसरात नागसेनवन साकारून १९ जून १९५० रोजी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. बाबासाहेबांनी स्वतः लक्ष घालून मिलिंद महाविद्यालयात उच्च शिक्षणासाठी पूरक आणि आवश्यक वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळांसह सुसज्ज इमारत आणि पर्यावरणीयदृष्ट्या निसर्गरम्य परिसर उभारणी केली होती.
नागसेनवनात उच्च शिक्षणासाठी येणारा विद्यार्थ्यांचा ओघ पाहता १९६३ मध्ये मिलिंद महाविद्यालयाचे त्रिभाजन करून मिलिंद कला महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय अशी तीन स्वतंत्र महाविद्यालये अस्तित्वात आणण्यात आली. या तीनही महाविद्यालयात आवश्यक पायाभूत सुविधा त्रिभाजनाच्या वेळीच निर्माण करण्यात आल्या. त्यानंतरच्या काळात १९६८ मध्ये डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय, १९८४ मध्ये पीईएस शारिरीक शिक्षण महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये नागसेनवनात उभी राहिली.
नागसेनवनाने मराठवाड्याचीच नव्हे तर संबंध महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, बौद्धीक आणि आर्थिक घुसळण करून महाराष्ट्राला नवा आयाम देत सामाजिक भान आणि जाण असलेली समृद्ध पिढी घडवली. नागसेनवनात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी केवळ दलित समाजघटकापुरतेच मर्यादित नव्हते, तर उच्च वर्णीय समाजघटकातील हजारो विद्यार्थीही नागसेनवनाने घडवले. नागसेनवनाचे उद्दिष्ट केवळ उच्च शिक्षण घेऊन पदव्या हाती घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी घडवणे नव्हते त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या गेलेल्या अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळीही नागसेनवनातूनच उभ्या राहिल्याचाही इतिहास आहे.
असा समृद्ध इतिहास आणि लौकिक असलेल्या मिलिंद कला महाविद्यालय, मिलिंद विज्ञान महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालय आणि पीईएस शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याची एकतर्फी कारवाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने केली आहे. ही कारवाई हेतुतः केली गेली आहे का? असा सवाल आता केला जात असून त्यासाठीची कारणमीमांसाही केली जात आहे. ती अशीः
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९४५ मध्ये स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदावरून के.एच. रंगनाथ हटल्यानंतर नागसेनवनासह पीईएसच्या देशभरातील सर्वच शैक्षणिक संकुलाला अंतर्गत कलहाचे ग्रहण लागले. तेव्हापासूनच नागसेनवनातील ‘नागसेन’ आणि ‘मिलिंद’ दोघांचीही फरफट सुरू झाली आहे.
- संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या कलहाच्या ग्रहणामुळे गेल्या कित्येक वर्षात नागसेनवनातील एकाही अनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ अध्यापकांची नियुक्ती होऊ शकली नाही. संस्थेअंतर्गत वाद असेल तर राज्य सरकारच शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची परवानगीच देत नाही, ही बाब एकतर्फी प्रवेशबंदीचा हुकुम काढण्यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाने लक्षात का घेतली नाही?
- हेही वाचाः बोगस पदवी प्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची कुलगुरूंना सदबुद्धी दे, विद्यापीठात रिपाइंचे साष्टांग दंडवत आंदोलन; ‘आर्थिक व्यवहार की…?’
- संस्थेअंतर्गत कलहामुळे पूर्णवेळ अध्यापकांची नियुक्ती होऊ शकली नसल्यामुळे हंगामीस्वरुपात तासिका तत्वावर अध्यापकांच्या नियुक्त्या करून शैक्षणिक गाडा हाकण्याची वेळ नागसेनवनातील विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांवर आलेली आहे, हेही विद्यापीठ प्रशासनाने लक्षात का घेतले नाही?
- पीईएस संस्थेअंतर्गत सुरू असलेल्या कलहामुळे संस्थेवर नेमके नियंत्रण कोणाचे? या प्रश्नाचे नेमके उत्तरच मिळत नसल्यामुळे नागसेनवनातील काही अनुदानित महाविद्यालयांचे वेतनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत केले जाते, ही बाबीकडेही विद्यापीठ प्रशासनाने प्रवेशबंदीचा हुकुम काढण्यापूर्वी हेतुतः दुर्लक्ष का केले?
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीमार्फत नागसेनवनात चालवल्या जाणाऱ्या विविध महाविद्यालयांना आवश्यक सुसज्ज इमारत, ग्रंथालय, प्रयोगशाळा, क्रीडांगण, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे इत्यादी पायाभूत सुविधा आहेत. प्राचार्यांच्या हातात नसलेली आणि सरकारी परवानगीवर अवलंबून असलेली फक्त पूर्णवेळ अध्यापकांची नियुक्ती नाही या एकाच निकषावर नागसेनवनातील विविध महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश रोखताना प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींकडे विद्यापीठ प्रशासनाने हेतुतः दुर्लक्ष का केले?
- नागसेनवनात उच्च शिक्षणासाठी येणारा मराठवाडा-विदर्भातील विद्यार्थी हा आधारवंचित, उपेक्षित समाज घटकातीलच असतो. आजही त्याला उच्च शिक्षणासाठी नागसेनवन हेच हक्काचे ठिकाण आणि आधारभूमी वाटते. त्यामुळे हा निर्णय घेताना सामाजिक भान आणि जाणही का ठेवली गेली नाही?
हे प्रश्न आता उघडपणाने उपस्थित केले जाऊ लागले आहेत आणि प्रशासकीय व तांत्रिक बाबींकडे हेतुतः दुर्लक्ष करून नागसेनवन ओस पाडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप करत आंबेडकरी समाजातून संतप्त प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. आता ५ ऑगस्टपर्यंत विद्यापीठ प्रशासनाने नागसेनवनातील विविध महाविद्यालयांवर घातलेली प्रवेशबंदी उठवली नाही तर आंबेडकरी समूहाकडून व्यापक आंदोलनाची तयारीही केली जाऊ लागली आहे.

