
पुणेः शहरातील उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या खराडी भागातील स्टे बर्ड गेस्ट हाऊसवर हाऊस पार्टीच्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर छापा टाकत गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये २ महिला व पाच पुरूषांत समावेश असून त्यातील एक जण प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई आहेत. पार्टीदरम्यान अंमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाता होता, असे पोलिसांनी सांगितले. या पार्टीत आणखी काही बड्या लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे.
खराडी परिसरातील रेडिसन हॉटेलजवळील एका फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती खबऱ्यामार्फत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तेथे छापा टाकून पाच पुरूष व दोन महिलांना ताब्यत घेतले. ताब्यात घेतलेल्या लोकांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यात प्रांजल खेवलकर हे एक आरोपी आहेत. सदर प्रकरणाची पुढील कारवाई सुरू आहे, असे गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.
प्रांजल खेवलकर हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी परिसरातील स्टे बर्ड सोसायटीत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्राजंल खेवलकर हे त्यांच्या मित्रांसोबत रेव्ह पार्टी करत असल्याची माहिती मिळाल्यावरून आमच्या टीमने छापा टाकला. त्यावेळी कारवाईत दारू, गांजा आणि हुक्काचा साठा आढळून आला. पोलिसांनी प्राजंल खेवलकरसह ताब्यात घेतलेल्या अन्य लोकांची ससून रूग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
प्राजंल खेवलकर हे एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत. पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकरसोबत लग्न केले. सध्या खडसे आणि खेवलकर कुटुंबीयांचे वास्तव्य मुक्ताईनगर येथे आहे.
प्रांजल खेवलकर यांचा जमीन खरेदी-विक्रीचा म्हणजे रिअल इस्टेटचा आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्याही आहेत. शिवाय त्यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनीही आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात असल्या तरी प्रांजल खेवलकर यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही.
असे काही तरी घडणार होतेचः खडसे
या प्रकरणावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून जे वातावरण सुरू होते, त्यावरून असे काहीतरी घडू शकते याचा अंदाज मला येत होता. आमच्यावर अशी काही तरी कारवाई केली जाईल किंवा ट्रॅप रचला जाईल, असे वाटतच होते. पुण्यामध्ये जी घटना घडली आहे, ते मी चॅनेलच्या माध्यमातून पाहिले. माझे त्यांच्याशी (प्रांजल खेवलकर) बोलणे झालेले नाही. ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत. जर पुण्यात घडलेली घटना खरोखर रेव्ह पार्टी असेल आणि माझे जावई त्यात असतील तर मी त्या गोष्टीचे समर्थन करणार नाही, परंतु जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न केला असेल तर ते मी सहन करणार नाही, असे खडसे म्हणाले.
…तर जावयाला अलर्ट का केले नाही?: महाजन
या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. त्यामुळे विषयाची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र जी माहिती हाती आली आहे, त्यावरून एकनाथ खडसे यांचे जावई प्राजंल खेवलकर हे रेव्ह पार्टीत होते. त्यांचा या पार्टीत नुसता समावेशच नव्हता तर त्यांनीच ही पार्टी आयोजित केली होती. जर ट्रॅप लावला जाणार होता याची कल्पना खडसेंना आधीच होती तर त्यांनी जावई बापूंना आधीच अलर्ट करायला हवे होते. त्यांना सांगायला हवे होते. या प्रकरणात दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे, असे गिरीश महाजन म्हणाले.
अख्खा भाजपच रेव्ह पार्टीःराऊत
गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटला आहे. याला आवरलं नाही तर हा देवेंद्र फडणवीसांनाही गाडल्याशिवाय राहणार नाही. दोन दिवसांपासून एकनाथ खडसे सरकारविरोधात, गिरीश महाजन यांच्याविरोधात, महिलेसंदर्भात, हनीट्रॅप प्रकरणात ठामपणे पुराव्यासह बोलत आहेत. त्यानंतर ताबडतोब २४ तासात ही रेव्ह पार्टीची कारवी झाली आहे. एकनाथ खडसे यांनी महाजनांवर जे आरोप केले त्याची चौकशी होत नाही, पण जो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात. अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव्ह पार्टी आहे. खोटे गुन्हे दाखल केले जातात, अशी टीका ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
