Video: धो धो पावसात एसटी बस भदाभदा गळू लागल्यामुळे प्रवाशांना आसनावर छत्री घेऊन बसण्याची वेळ, पाटोदा-बीड-परभणी बसमधील विदारक चित्र!


बीडः बाहेर धो धो पाऊस सुरू आहे आणि तुम्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणार असला तरीही सोबत छत्री असू द्या. एसटी महामंडळाच्या बसमध्येही तुमच्यावर बाहेरच्या धो-धो पावसाप्रमाणेच भिजून चिंब होण्याची वेळ येऊ शकते. बाहे कोसळणाऱ्या धो धो पावसामुळे एमएच-१४-बीटी०२६१५ क्रमांकाची पाटोदा-बीड-परभणी बस भदाभदा गळू लागल्यामुळे शनिवारी सकाळी प्रवाश्यांना आसनावर छत्र्यावर घेऊन बसण्याची आणि ज्यांच्याकडे छत्र्या नव्हत्या त्यांना बसमध्येच भिजून चिंब भिजण्याचा आनंद तिकिटाचे पैसे खर्चून घ्यावा लागला.

पाटोदा आगाराची बस बीड-माजलगाव मार्गे परभणीला जाते. नियमित धावणारी ही बस याच मार्गाने परतीचा प्रवासही करते. शनिवारी सकाळी १० वाजता पाटोद्याहून निघालेली ही बस सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बीडमध्ये पोहोचली. बीडमधून बस स्थानकातून ही निघाल्यानंतर धो धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे बसही भदाभदा गळू लागली. पावसाच्या पाण्याच्या धारा आसनावर गळू लागल्यामुळे ज्या प्रवाश्यांकडे छत्र्या होत्या, ते छत्र्या काढून आसनावर बसले तर ज्यांच्याकडे छत्र्या नव्हत्या त्यांच्यावर राज्य परिवहन महांडळाच्या ‘कृपाशीर्वादा’ने धावत्या बसमध्येच चिंब भिजून जाण्याचा ‘आनंद’ घ्यावा लागला.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही सुखावलेले असतानाच दुसरीकडे मात्र त्यांना गळती लागलेल्या बसमधून चिंब भिजून प्रवास करावा लागत असल्यामुळे प्रवाशात नाराजी आणि संताप व्यक्त केला जात आहे. सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून एसटी महामंडळाच्या बसकडे पाहिले जाते. परंतु या जीवन वाहिनीतून भर पावसात पाण्याच्या धारा धो धो गळू लागल्यामुळे एसटी महामंडळाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पहा व्हिडीओः

‘लाडकी बस गळती योजने’चा त्वरित लाभ घ्या…

पाटोदा-बीड-परभणी या धावत्या बसमधील गळतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकरी एसटी महामंडळाचे वाभाडे काढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या बसगळतीवरून महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महायुतीने जाहीर केली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बस गळती योजना…पहा, पाटोदा-बीड-परभणी एसटी बसमधील लाभार्थी…! योजनेसाठी कोणतेही निकष नाहीत… आणि हो, छाणनीनंतर लाभार्थ्यांना अपात्रदेखील ठरवण्यात येणार नाही… त्वरित लाभ घ्यावा,’ असे खोचक ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!