नवी दिल्लीः देशासमोरील खऱ्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करून खिसा कापण्यासाठीच २४ तास हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे. या कामात फक्त भाजपच नाही तर टीव्ही मीडियाही सामील आहे. खोलात जाऊन विचार केला तर हा द्वेष अदानी-अंबानी पसरवत आहेत. तेच हे सरकार चालवत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवरही स्वतःचेच नियंत्रण नाही, अशा आक्रमक शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात निघालेल्या भारत जोडो यात्रेचा २४ डिसेंबर रोजी १०९ वा दिवस आहे. ही यात्रा आज, २४ डिसेंबर रोजी दिल्लीत पोहोचली. दिल्लीमध्येही या भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ राहुल गांधी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टिकास्त्र सोडले. मी २ हजार ८०० किलोमीटर चाललो आहे, परंतु मला कुठेही द्वेष दिसला नाही. हिंसा दिसली नाही. परंतु जेव्हा मी टीव्ही सुरू करतो तेव्हा सगळीकडे मला द्वेष आणि हिंसा दिसते. मीडिया पडद्यामागची वस्तुस्थिती कधीच दाखवत नाही, परंतु ते द्वेष मात्र दाखवतात. नोटबंदी आणि जीएसटीने या देशातील छोटे व्यापारी, मजूर, शेतकऱ्यांची कंबरडे मोडले, परंतु मीडिया हे दाखवत नाही. देशातील प्रत्येक नागरिक सदभावनेने राहू इच्छितो, असे राहुल गांधी म्हणाले.
‘वास्तविक हिंदुस्तान’ समोर मांडणे हा भारत जोडो यात्रेचा उद्देश आहे, जेथे लोक एकमेकांशी प्रेमाने राहतात. सदभावना बाळगतात. भाजप आणि आरएसएस द्वेष पसरवण्याच्या मागे लागले आहेत, ही वेगळी गोष्ट आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
जेव्हा कोणी तुमचा खिसा कापतो तेव्हा काय करतो?… सर्वात आधी तो तुमचे लक्ष विचलित करतो. देशात सध्या जे काही केले जात आहे, ते सर्व तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच केले जात आहे. ही गोष्ट ते २४ तास करतात आणि मग तुमचा खिसा कापला जातो. शेतकऱ्यांचा, मजुरांचा जो काही पैसा आहे तो थेट त्यांच्या मालकांच्या खिशात जातो. हे नरेंद्र मोदींचे सरकार नसून अंबानी आणि अदानींचे सरकार आहे, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा दोष नाही, ते परिस्थिती सांभाळू शकत नाही आहेत. त्यांच्यावरही त्यांचे स्वतःचे नियंत्रण नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मी खरे सांगतोय, विमानतळही त्यांचा, बंदरही त्यांचा, लाल किल्लाही त्यांचा. सार्वजनिक क्षेत्रातील सर्व कंपन्याही त्यांच्या आहेत. रेल्वे त्यांच्या आहेत. महामार्गही त्यांचे आहेत, सेलफोनही त्यांचे आहेत. ताजमहलही निघून जाईल. हे देशाचे वास्तव आहे. पण सत्य आमचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
आज दिल्लीत पोहोचलेली भारत जोडो यात्रा जवळपास नऊ दिवस थांबलेली असेल. ३ जानेवारीपासून ही यात्रा पुन्हा सुरू होणार आहे.