नवी दिल्लीः मोबाइल फोन हा आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. हल्ली बरीचशी कामे मोबाइल फोनवर चुटकी सरशी होऊ लागली आहेत. मनोरंजनाबरोबरच दैनंदिन कामजाततही महत्वाची भूमिका बजावत असलेल्या मोबाइल फोनवर सरकार आता आणखी एक नवीन सुविधा देण्याच्या प्रयत्नात आहे. डीटूएचच्या माध्यमातून घरातील टीव्हीवर चॅनेल्सचे प्रसारण होते. त्याच धर्तीवर आता डायरेक्ट टू मोबाइल सेवा सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजेच तुम्हाला इंटरनेटशिवाय कोणतेही टीव्ही चॅनेल्स थेट मोबाइल फोनवरच पाहता येणार आहेत.
सध्या मोबाइल फोनवर मनोरंजनाचे व्हिडीओ अथवा कोणताही कंटेन्ट पाहण्यासाठी तुम्हाला इंटरनेट पॅक टाकणे अनिवार्य आहे. या इंटरनेट पॅकच्या माध्यमातून टेलिकॉम कंपन्या मोठा नफा कमावतात. परंतु आता मोबाइल फोनवर इंटनेटशिवाय टीव्ही पाहण्याची सुविधा मिळणार असल्यामुळे त्याचा टेलिकॉम कंपन्यांना मोठा फटका बसू शकतो.
सरकारने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी परवानगी दिली आहे. या तंत्रज्ञानामुळे टीव्हीवर केबल आणि डीटीएचच्या माध्यमातून थेट टीव्ही चॅनेल्स पाहतात येतात, त्याच प्रमाणे थेट मोबाइलच्या स्क्रीनवर इंटरनेटशिवाय टीव्ही पाहता येणार आहे. आयआयटी कानपूर, टेलिकॉम विभाग आणि सूचना व प्रसारण मंत्रालय या तंत्रज्ञानाच्या विकासावर काम करत आहेत.
देशात जवळपास २२ कोटी लोकांच्या घरात टीव्ही आहे तर देशातील स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या ८० कोटींच्या घरात आहे. स्मार्टफोन वापरकर्त्यांची ही संख्या २०२६ पर्यंत १०० कोटींच्यावर वर पोहोचण्याची शक्यता आहे.
मोबाइलवर ८० टक्के इंटरनेटचा वापर हा व्हिडीओ पाहण्यासाठीच होतो. आता नव्या तंत्रज्ञानामुळे थेट मोबाइल स्क्रीनवर टीव्ही पाहता येणार असल्यामुळे मोबाइलवर इंटरनेटचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ब्रॉडकास्ट कंपन्यांना ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा देण्याचा प्रस्तावही सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे मोबाइल नेटवर्कचा वापर कॉल किंवा इतर माध्यमांसाठी फ्री राहील. त्यातून कॉल ड्रॉपची समस्याही कमी होईल.