छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): गैरप्रकारांचे ग्रहण लागलेल्या वन विभागाच्या परीक्षेत पास करून देण्याचा दावा करणारे एक मोठे रॅकेट उजेडात आले आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) पोलिसांनी या परीक्षेत घोटाळा करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला असून वन विभागाच्या परीक्षेत पास करून देण्यासाठी पाच ते दहा लाख रुपये उकळणाऱ्या टोळीला सिडको एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
वन विभागाच्या परीक्षेत पास करून देण्याचे आमिष दाखवून या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना मिळाली होती. एमआयडीसी सिडको पोलिसांनी छापेमारी करून चौकशी केली असता या परीक्षेतील मोठे रॅकेट समोर आले आहे.
या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यात एका स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या संचालकाचाही समावेश आहे. अमोल धनराज निचड (वय ३० वर्षे, व्यवसाय-शिक्षण, राहणार- मु.पो. खंदाळा, ता आकोट, जिल्हा अकोला), अण्णाजी धनाजी काकडे (वय-२९ वर्षे, व्यवसाय- संत बाळुमामा अकॅडमी संचालक, राहणार- पिंपळवाडी, वडुज, ता. खटाव, जि. सातारा), अनिल भरत कांबळे (रा. सातारा, जि. सातारा) आणि संदीप भुतेकर (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी छापेमारी करून चौकशी केली असता या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या चारही आरोपींनी संगनमत करून वन विभागाच्या परीक्षार्थी उमेदवारांना वनरक्षकपदाची शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची मागणी केली. या उमेदवारांची मूळ कागदपत्रे ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चेकही घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघडकीस आले आहे.
पोलिसांच्या चौकशीत संदीप भुतेकर याच्या नावे पाच लाखांचा एक चेक, अमोल धनराज निचड याच्या नावे पाच लाख रुपयांचे दोन चेक आढळून आले आहेत. या आरोपींकडे परीक्षार्थी उमेदवारांची दहावीची सनद, गुणपत्रिका, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र आणि जातीची प्रमाणपत्रेही आढळून आली आहेत. या टोळीने औरंगाबाद जिल्ह्यातील कितीजणांना वन विभागाच्या परीक्षेत पास करून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळले आहेत, याचा पोलिस शोध घेत आहेत.