बीजिंगः कामाचा ताण आणि वेळखाऊ कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे रस्त्याच्या कडेला बसलेल्या व्हेंडर्सकडून भावनिक संबंध विकत घेण्याकडे चीनमधील युवा पिढीचा कल वाढला आहे. त्यातून चीनमध्ये ‘स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस’चा बाजार चांगलाच फुलत चालला आहे. या बाजारात तुम्हाला मिठी, चुंबनापासून ते लैंगिक संबंधापर्यंतच्या सगळ्याच गोष्टी विकत मिळतात. प्रत्येक सेवेचा निश्चित असे दर आहेत. चीनमधील तरूण महिलांचा एक वर्ग अशा सेवा विकण्यासाठी बाजारात बसला आहे. त्यामुळे या सेवा सहजपणे उपलब्ध होऊ लागल्या आहेत आणि स्वस्त दरात त्या खरेदीही करता येऊ लागल्या आहेत.
दैनंदिन तणावाचा सामना करणे म्हणावे तसे सोपे नाही. या तणावातून मार्ग काढण्यासाठी चीनने आता ‘भावनिक संबंध’ नावाचे नवीन उत्पादन शोधून काढले आहे आणि आता सहजपणे रस्त्यावर विकले जाऊ लागले आहे. ‘साऊथ चायना मॉर्नंग पोस्ट’ने दिलेल्या वृत्तानुसार चीनच्या शेनझेन शहरातील रस्त्यावर तरूणी मिठी म्हणजे आलिंगन, चुंबन आणि आपला सहवास विकण्यास तयार आहेत. स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस नावाचे हे नवे उत्पादन घेऊन बसलेल्या तरूणी १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या तरूणांना या सेवा विक्री करत आहेत. त्यावरून जागतिकस्तरावर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
शेनझेनमधील मेट्रो रेल्वेस्टेशनजवळ रस्त्यावर एका तरूणीने स्टॉल लावला आहे. त्या स्टॉलवर विविध सेवांचे दरपत्रक लावलेले आहे. मिठी म्हणजेच आलिंगन देण्यासाठी १ युआन म्हणजेच ११ रुपये पैसे, चुंबन घेण्यासाठी १० युआन म्हणजेच ११७ रुपये, सोबत चित्रपट पाहण्यासाठी १५ युआन म्हणजेच १७६ रुपये असे दरपत्रक तिच्या स्टॉलवर लावलेले आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
एक दिवासाची प्रेयसी बनण्यासाठी ६०० युआन म्हणजेच जवळपास ७००० रुपये. मी तुमची खुबीने देखभाल करू शकते. ज्यात सोबत जेवण, आलिंगन, चुंबनाचाही समावेश आहे, परंतु सेक्स नाही, असे अन्य एका स्ट्रीट गर्लफ्रेंडच्या स्टॉलवर लावलेल्या फलकावर लिहिलेले आढळून आले आहे.
चीनमधील ही स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस देणाऱ्या या तरूणींना तुम्ही पैसे देऊन काही तासांसाठी आपली गर्लफ्रेंड मानू शकता. एखादी गर्लफ्रेंड तुमच्यावर जशी प्रेम करते, तसेच प्रेम ही स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस देणारी तरूणीही तुमच्यावर करेल. स्ट्रीट गर्लफ्रेंडच्या या सेवा विकत घेण्याचा ट्रेंड चीनमधील अविवाहित तरूण मुलांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
या स्ट्रीट गर्लफ्रेंड तुमच्यासोबत बसून दारू पितात. तुमच्या घरी येऊन तुमच्या घरातील कामात मदतही करतात. त्यासाठी त्यांचे वेगवेगळे दर ठरलेले आहेत. या सेवा देणाऱ्या तरूणीने तुमच्या सोबत बसून दारू प्यावी, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी तुम्हाला ४० युआन म्हणजेच ४७० रुपये मोजावे लागतील. घरी येऊन घर कामात तिची मदत हवी असेल तर त्यासाठी २० युआन म्हणजेच २३५ रुपये मोजावे लागतील. या स्ट्रीट गर्लफ्रेंडसोबत तुम्हाला आऊटिंग करायचे असेल तर एका आऊटिंगसाठी तुम्हाला १०० युआन म्हणजेच जवळपास १ हजार १७५ रुपये मोजावे लागतील.
चीनमध्ये सुरू असलेली ही स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस चीनच्या विद्यमान कायद्याच्या नियामक संरचनेच्या कार्यकक्षेबाहेर सुरू आहे. ही सेवा वेश्यावृत्ती किंवा लैंगिक सेवा देवाणघेवाणीत बदलण्याचा धोका आहे, अशी भीती काही वकिलांनी बोलून दाखवली आहे.
या स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिसवरून चीनमधील नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काही लोकांच्या मते त्यांना या महिलांशी गप्पागोष्टी करायला आवडते. तर काहींच्या मते, महिलांच्या सहवासाची किंमत लावणे हे महिलांचा अनादर करणारे आहे आणि त्यांच्या सन्मानाला हीन लेखणारे आहे. या स्ट्रीट गर्लफ्रेंड स्वेच्छेने या सेवा देत असल्या तरी या कामात गुंतलेल्या महिलांची सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे, असे काही जणांना वाटते.