सर्रास दुरूपयोगामुळे धारणाधिकाराचीच ‘पाचावर धारण’, ‘बामु’चे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्याकडूनही पायमल्ली!


छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): राज्यातील अकृषि विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी आणि अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून मूळ पदावरील धारणाधिकाराचा (लीन) सर्रास दुरूपयोग केला जात असून त्यामुळे धारणाधिकाराचीच पाचावर धारण बसण्याची वेळ आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक डॉ. श्याम शिरसाठ यांनीही धारणाधिकाराची अशीच पायमल्ली केली असून ते ‘तांत्रिक पळवाट’ शोधून याच विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदाचे ‘गुलगुले’  खात आहेत. विद्यापीठाच्या वैधानिकपदावरील व्यक्तीकडूनच नियम व कायद्याची पायमल्ली केली जाण्याचा हा प्रकार धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा आहे.

 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार प्र-कुलगुरू हे पद कुलगुरूंच्या लगतनंतर संपूर्ण विद्यापीठाची कार्यकक्षा असणारे विद्याविषयक व कार्यकारी अधिकारी असे सर्वोच्च आहे. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर बसलेली व्यक्तीच शासन धोरणाची उघडउघड पायमल्ली करत असेल तर स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा करायची तरी कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रा. डॉ. श्याम शिरसाठ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागात प्रपाठकपदी (सहयोगी प्राध्यापक) रूजू झाले. त्यापूर्वी ते विवेकानंद कला व सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अधिव्याख्याता होते. विद्यापीठात रूजू झाल्यानंतर येथेच ते पदोन्नतीने प्राध्यापक बनले. प्राध्यापक झाल्यानंतर डॉ. श्याम शिरसाठ यांची २०१७ मध्ये विवेकानंद कला व सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे धारणाधिकारासाठी अर्ज केला. त्यांच्या विनंतीनुसार विद्यापीठ प्रशासनाने डॉ. शिरसाठ यांना दिनांक १९ डिसेंबर  २०१७ रोजी त्याच दिवशीच्या दुपारनंतरपासून सलग पाच वर्षांसाठी धारणाधिकार मंजूर केला (संदर्भः विद्यापीठाचे पत्र क्रमांक- आस्था/विभाग/२०१७/५५२३-२६ दिनांकः १९/१२/२०१७) आणि डॉ. शिरसाठ हे २० डिसेंबर २०१७ रोजी विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू झाले.

विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा गाडा हाकतानाच डॉ. शिरसाठ हे आणखी मोठ्या पदाच्या संधी शोधत राहिले. दरम्यानच्या काळात डॉ. प्रमोद येवले यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली आणि डॉ. शिरसाठ यांना प्र-कुलगुरूपदाची स्वप्ने पडू लागली आणि त्यांनी जोरदार फिल्डिंगही लावली. विद्यापीठ अधिनियमातील तरतुदींनुसार कुलपतींनी कुलगुरूंशी सल्लामसलत करूनच प्र-कुलगुरूंची नियुक्ती करणे अनिवार्य आहे. त्यानुसार कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ज्या तीन व्यक्तींची प्र-कुलगुरूपदी नियुक्ती करण्याचा ‘सल्ला प्रस्ताव’ कुलपतींकडे पाठवला होता, त्यात डॉ. शिरसाठ यांचे नावच नव्हते.

परंतु डॉ. शिरसाठ यांनी जोरदार फिल्डिंग लावल्यामुळे कुलगुरूंच्या सल्ला प्रस्तावात नाव नसूनही कुलपतींनी त्यांची २८ ऑक्टोबर २०२० रोजी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती केली आणि तसे पत्र विद्यापीठाला पाठवले. प्र-कुलगुरूपदी नियुक्ती होताच डॉ. शिरसाठ यांनी तातडीने विवेकानंद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा राजीनामा दिला आणि काही तासांसाठी ते आपल्या मूळ पदावर म्हणजेच विद्यापीठातील लोकप्रशासन विभागातील प्राध्यापकपदावर रूजू झाले. तोपर्यंत डॉ. शिरसाठ यांनी ३ वर्षे २ महिने ८ दिवस धारणाधिकार उपभोगला होता आणि नियमानुसार १ वर्षे ११ महिने २२ दिवस धारणाधिकार शिल्लक होता.

प्र-कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर डॉ. शिरसाठ प्राचार्यपदाचा राजीनामा देऊन २९ ऑक्टोबर २०२० रोजी धावतपळत आपल्या मूळ पदावर येऊन रूजू झालेल्या डॉ. शिरसाठ यांनी पुन्हा विद्यापीठ प्रशासनाकडे धारणाधिकारासाठी अर्ज केला. डॉ. शिरसाठ यांना आधीच पाच वर्षे कालावधीचा धारणाधिकार मंजूर केलेल्या विद्यापीठ प्रशासनानेही ‘उदार अंतःकरणा’ने त्याच दिवशी म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२० रोजी डॉ. शिरसाठ यांना पुन्हा एकदा पाच वर्षांचा धारणाधिकार मंजूर केला. संदर्भः विद्यापीठाचे पत्र क्रमांकः आस्था/विभाग/२०२०/११४०२-०५ दिनांक २९/१०/२०२०) आणि त्यांना प्र-कुलगुरूपदी रूजू होण्यासाठी मध्यान्हपूर्व रिलिव्ह केले आणि त्याच दिवशी मध्यान्हानंतर डॉ. शिरसाठ हे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी रूजू झाले.

या संपूर्ण प्रकरणात मजेशीर बाब अशी की, डॉ. शिरसाठ यांना ज्या मूळ पदावर नियुक्त करण्यात आले होते, ते मूळ पद डिसेंबर २०१७ पासून रिक्त आहे. डॉ. शिरसाठ यांच्या प्राध्यापकपदाच्या कार्यभाराचे वहन डिसेंबर २०१७ पासून ते आजपर्यंत कुणीही केलेले नाही. असे असले तरी प्र-कुलगुरूपदी नियुक्ती होताच डॉ. शिरसाठ काही तासांसाठी आपल्या मूळ पदावर ‘पाहुणे’ म्हणून आले आणि पुन्हा परागंदा झाले आहेत.

डॉ. शिरसाठ यांना विद्यापीठ प्रशासनाने मंजूर केलेला एकूण धारणाधिकाराचा कालावधी तब्बल दहा वर्षे आहे. त्यापैकी काही तासांचा तांत्रिक कालखंड वगळता डॉ. शिरसाठ यांनी आजवर उपभोगलेला धारणाधिकार तब्बल ५ वर्षे  ४ महिने ८ दिवस कालावधीचा आहे. तरीही ते अद्याप प्र-कुलगुरूपदी कायम आहेत आणि त्यांचा मूळ पदावरील धारणाधिकारही अबाधित आहे. हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २३ ऑगस्ट २०१० रोजी जारी केलेल्या शासन निर्णयाचे हे सर्रास उल्लंघन आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांना विद्यापीठ प्रशासनाने पाच-पाच वर्षे कालावधीसाठी दोन वेळा धारणाधिकार मंजूर केल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.

काय सांगतो नियम?

राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठाच्या परिनियमांत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी धारणाधिकार मंजुरीबाबत आणि धारणाधिकार कालावधीबाबत विद्यापीठनिहाय वेगवेगळ्या तरतुदी असल्यामुळे धारणाधिकार मंजूर करताना येणाऱ्या अडचणी आणि धारणाधिकार किती कालावधीकरिता मंजूर करावा याबाबत संभ्रम असल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २३ ऑगस्ट २०१० रोजी शासन निर्णय (क्रमांकःनियुक्ती-२०१०/(प्र.क्र.३३७/२०१०)/म.शि.५) जारी करून धारणाधिकाराचा कालावधी आणि मंजुरी प्रक्रियेत एकवाक्यता आणि सुसूत्रता आणली आहे.

या शासन निर्णयातील नियम ३ मधील तरतुदींनुसार अकृषी विद्यापीठे आणि अनुदानित/विनाअनुदानित महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी  धारणाधिकार जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी मंजूर करता येईल. मात्र विद्यापीठ कायद्यातील वैधानिक पदावर नियुक्ती झाल्यास, त्याबाबतीत ५ वर्षांसाठी धारणाधिकार मंजूर करता येईल. त्यानंतर तो आपोआपच संपुष्टात येईल, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे.

म्हणजेच एखाद्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला त्याच्या संपूर्ण सेवाकाळात वैधानिकपद गृहित धरून जास्तीत जास्त पाचच वर्षे धारणाधिकार उपभोगता येतो. त्यापेक्षा जास्त काळ धारणाधिकार उपभोगता येत नाही.  हा धारणाधिकार ती व्यक्ती सलग एक वेळ किंवा खंडाखंडाने उपभोगू शकते. परंतु धारणाधिकाराचा संपूर्ण सेवाकाळातील कालावधी पाच वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये, असेच या शासन निर्णयातून स्पष्ट होते.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २३ ऑगस्ट २०१० रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जास्तीत जास्त पाचच वर्षांचा धारणाधिकार घेता येतो.

मूळ पदावरील ‘धारणा’ही संपुष्टात

या शासन निर्णयातील तरतुदींनुसार डॉ. श्याम शिरसाठ यांनी निर्धारित वैध कालावधीसाठी असलेला धारणाधिकार उपभोगला आहे. मूळ पदावरील ‘धारणा’ कायम ठेवण्यासाठी ते विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभात औटघटकेसाठी रूजू झाल्यामुळे त्यांच्या धारणाधिकारातील अखंडत्व संपुष्टात येत नाही. कारण त्यांच्या ‘धारणे’चे पद २०१७ पासून रिक्त असून त्या पदाच्या कार्यभाराचे वहनही अन्य कुणीही केलेले नाही.  त्यामुळे डॉ. शिरसाठ यांचा धारणाधिकार १९ डिसेंबर २०२२ रोजी आपोआपच संपुष्टात आला असून पाच वर्षे कालावधी संपल्यानंतर ते आपल्या मूळ पदावर रूजू झालेले नसल्यामुळे त्यांचा त्यांच्या मूळ पदावरील हक्कही संपुष्टात आलेला आहे. मूळ पदावरील हक्कच संपुष्टात आलेला असताना डॉ. शिरसाठ हे गेल्या पाच महिन्यांपासून प्रकुलगुरूपदावर कसे? हाही प्रश्नच आहे.

मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण?

२०१० च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार  एखादी व्यक्ती धारणाधिकाराचा जास्तीत जास्त कालावधी उपभोगूनही त्याच्या मूळ पदावर परत रूजू झाली नाही तर त्या व्यक्तीचा त्या मूळ पदावरील हक्क आपोआपच संपुष्टात येतो. डॉ. श्याम शिरसाठ हे पाच वर्षे कालावधी उलटूनही विद्यापीठातील त्यांच्या मूळ पदावर रूजू झालेले नसल्यामुळे त्यांचा लोकप्रशासन विभागातील प्राध्यापक’ या पदावरील हक्कही संपुष्टात आल्यामुळे नियमाप्रमाणे विद्यापीठ प्रशासनाने त्यांना विद्यापीठाच्या सेवेतून सेवामुक्त करणे क्रमप्राप्त ठरते.

 परंतु डॉ. शिरसाठ हेच विद्यापीठात प्र-कुलगुरूसारख्या वैधानिक पदावर बसलेले असल्यामुळे  आणि ते कुलगुरूंच्या लगतनंतर संपूर्ण विद्यापीठाची कार्यकक्षा असणारे विद्याविषयक व कार्यकारी अधिकारी असल्यामुळे त्यांना सेवामुक्त करणार तरी कोण? आणि त्यांच्या नियमबाह्य धारणाधिकाराबद्दल बोलणार तरी कोण? असा प्रश्न निर्माण झाला असून मांजराच्या गळ्यात घंटा बांधायची तरी कुणी? अशीच काहीशी ही स्थिती आहे.

…ही लपवाछपवी कशासाठी?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांचा बायोडेटा देण्यात आला आहे. या बायोडेटामध्ये डॉ. श्याम शिरसाठ यांनी त्यांच्या एकूणच कारकिर्दीत कोणत्या शैक्षणिक व व्यावसायिक संस्था/ अधिकार मंडळांवर काम केले, याचा तपशील वर्षे आणि तारखेनुसार विस्तृतपणे देण्यात आला आहे. मात्र पदनिहाय अनुभव देताना मात्र ते कोणत्या महाविद्यालयात कोणती तारीख व वर्षापासून कोणत्या तारीख व वर्षांपर्यंत कार्यरत होते, याचा कुठलाच तपशील देण्यात आलेला नाही.

एवढेच काय विद्यापीठाच्या सेवेत ते कोणत्या तारखेला आणि कोणत्या वर्षी रूजू झाले, याचाही तपशील दडवण्यात आला आहे. अन्य बाबींचा तारीख आणि वर्षानुसार तपशील दिला जात असताना पदानुसार अनुभवाच्या तपशीलात मात्र तारीख आणि वर्षाची लपवाछपवी का करण्यात आली?, असा प्रश्न त्यांचा बायोडेटा पाहिल्यानंतर कुणालाही पडल्याशिवाय रहात नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर डॉ. श्याम शिरसाठ यांचा बायोडेटा देण्यात आला आहे. त्यात इतर तपशील तारखांनुसार देण्यात आला. मात्र पदनिहाय अनुभवाच्या तारखा आणि वर्षच गायब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!