छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): युवकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात राहून स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या मोफत अभ्यासिकेच्या माध्यमातून चांगली मदत मिळणार आहे. सदर अभ्यासिकेची वेळ शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे.शासकीय सुट्टीच्या दिवशी अभ्यासिका बंद असणार आहे.
समाज कल्याण विभाग, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात अभ्यासिकेसाठी प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अभ्यासिकेसाठी प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन श्रीमती जयश्री सोनकवडे यांनी केले आहे.
अर्ज मिळण्यासाठी प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील कार्यालय अधीक्षक एस.डी.घुले, (मो.क्र.९९७०२६०२८४) यांच्याशी संपर्क करावा, असे समाज कल्याण विभागातर्फे कळवण्यात आले आहे.