छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): भोपाळ येथे नुकत्याच झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ बाद फेरीतच स्पर्धेबाहेर फेकला गेला असताना या संघाने या स्पर्धेत बरकतुल्ला विद्यापीठाच्या संघाशी अंतिम फेरीत लढत देऊन उपविजेतेपद पटकावल्याच्या खोट्या बातम्या छापून आणून पाठ थोपटून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
रविंद्रनाथ टागोर विद्यापीठ आणि मध्य प्रदेश सरकारच्या क्रीडा व युवा कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने भोपाळ येथे पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मेजर ध्यानचंद स्टेडियमवर २ जानेवारी ते ८ जानेवारीदरम्यान झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील विद्यापीठांचे ५४ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत सहभागी संघांचे बाद फेरीसाठी ए. बी. सी आणि डी असे चार पूल तयार करण्यात आले होते. त्यापैकी डी पूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा पुरूष हॉकी संघाचाही समावेश होता. बाद फेरीच्या सामन्यात बरकतुल्ला विद्यापीठाच्या संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाचा पराभव केला आणि हा संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला. त्यामुळे या संघाला गाशा गुंडाळून परतावे लागले.
बाद फेरीतच गारद झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाचे स्पर्धेतील अस्तित्वतच संपुष्टात आलेले असतानाही इकडे मराठवाड्यात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरूष हॉकी संघाने पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत उपविजेतेपद पटकावल्याच्या खोट्या बातम्या काही वृत्तपत्रांमध्ये छापून आणून पाठ थोपटून घेण्याचा धक्कादायक प्रकार घडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरूष हॉकी संघाने कशी चमकदार कामगिरी केली. जबलपूर विद्यापीठाच्या संघाचा पराभव करून अंतिम फेरीत कसे स्थान मिळवले, असे रसभरीत खोटे वर्णन छापून आणण्यात आले आणि न केलेल्या कामगिरीबद्दल पाठ थोपटवून घेण्यात आली.
वस्तुतः या स्पर्धेत रविंद्रनाथ टागोर विद्यापीठाचा संघ विजेता ठरला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संघ दुसऱ्या स्थानी तर बरकतुल्ला विद्यापीठाचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. कोटा विद्यापीठाच्या संघाने चौथे स्थान पटकावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संघाला यात कुठेही स्थान नसताना या स्पर्धेत हा संघ उपविजेता ठरल्याची खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन पाठ थोपटवून का घेण्यात आली? हा खरा प्रश्न आहे.
याबाबत न्यूजटाऊनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाचे प्रभारी क्रीडा संचालक संदीप जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही ही बातमी दिली नाही, असे सांगत अंग झटकले. क्रीडा संचालकपदावर जगताप बसला असल्यामुळे काही जणांच्या पोटात दुखत असल्याचेही ते म्हणाले. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हॉकी संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाल्याची खोटी बातमी ६ जानेवारी रोजी दिव्य मराठीत छापून आणण्यात आली. त्याबाबत विद्यापीठाचे प्रभारी संचालक संदीप जगताप यांनी खंडण का केले नाही किंवा स्पष्टीकरण का दिले नाही, हा प्रश्न आहे.
परंतु बातमी ज्या तपशीलाने देण्यात आली आहे, तो तपशील पाहता विद्यापीठाचा संघ उपविजेता ठरल्याचे पत्रकारांना काही स्वप्न पडले नसावे, त्यांना पद्धतशीरपणे ही माहिती पुरवण्यात आली आणि बातम्या छापून आणण्यात आल्याचेच स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (८ जानेवारी) झाला. परंतु हा सामना होण्याच्या आधीच ‘लोकमत समाचार’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ उपविजेता ठरल्याची बातमी छापून आणण्यात आली. आता विद्यापीठ प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.