मोदींची नक्कल भोवली, शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंविरोधात गुन्हा दाखल, म्हणाल्या, कायदा माझ्या बापाने….


मुंबईः शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत ‘प्रक्षोभक भाषण’ केल्याप्रकरणी शिवसेनेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विनायक राऊत, आ. भास्कर जाधव यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत. कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कुणी करायचा? पोलिसांच्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देईन, असे अंधारे म्हणाल्या.

हेही वाचाः ‘भामटेगिरी’ फसली: ‘डॉ.बामु’च्या वादग्रस्त कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांचा राजीनामा

ठाण्यात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यात आली. अन्य नेत्यांबद्दलही अवमानजनक शब्द वापरण्यात आले, अशी तक्रार नौपाडा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपविभागप्रमुख बाळा गवस यांनी नौपाडा पोलिसांत दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांना अंधारेंसह अन्य नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो कोणी सत्य बोलेल त्याला भीती दाखवली जाते. त्यामुळे धक्का बसण्यासारखे काहीच नाही. मोदींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला असेल तर ती नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला तर राज ठाकरेंनी केल्या आहेत. देशात प्रश्न विचारणे आणि सत्य मांडणे गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहोत, असे अंधारे म्हणाल्या.

मला अद्यापही पोलिसांची कोणतीही नोटीस प्राप्त झाली नाही. नोटीस मिळाली तर पोलिस ठाण्यात हजर होईल. कारण कायदा माझ्या बापाने लिहिला आहे. त्याचा आदर मी नाही करायचा तर कोणी करायचा? त्या नोटिसीला कायदेशीर उत्तर देण्यात येईल, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!