जळगावात राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, सुवर्ण नगरीत खळबळ


जळगावः माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या असलेल्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने कारवाई करत चौकशी सुरू केली आहे. ईडीच्या या कारवाईमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत मोठी खळबळजनक उडाली आहे. स्टेट बँकेकडून घेतलेल्या आणि थकीत कर्जाच्या संदर्भात ईडीच्या पथकाने ही कारवाई केली.

ईडीच्या पथकाच्या १० गाड्या एकाच वेळी जळगाव जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. माजी आमदार मनीष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या जळगावसह नाशिकमधील एकूण सहा फर्मवर त्यांनी एकाच वेळी छापेमारी करत कारवाई केली. ईडीच्या पथकाने सर्व ठिकाणाच्या मालमतात आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे.

या कारवाईमध्ये ईडीचे एकूण ६० अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.राजमल लखीचंद उर्फ आर. एल. ज्वेलर्सवर कारवाई सुरू झाल्यानंतर शोरूम बंद करण्यात आले. तरीही काही ग्राहक दुकानाबाहेर गर्दी करत होते. त्यामुळे स्वतः मनीष जैन यांनी काहीवेळ शोरूमच्या बाहेर येऊन स्थितीचा आढावा घेतला आणि ग्राहकांची समजूत काढली.

ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे ताब्यात घेत मनीष जैन यांची चौकशी केली. ईश्वरलाल जैन यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे ते चौकशीसाठी उपस्थित नसल्याचे सांगण्यात आले. जैन यांनी स्टेट बँकेकडून घेतलेल्या ६०० कोटी रुपयांच्या थकित कर्जासंबंधी ही कारवाई असल्याचे सांगितले जाते. मागच्या वर्षीही सीबीआयने राजमल लखीचंद ज्वेलर्सची चौकशी केली होती.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!