फडणवीस समर्थक मुन्ना यादवच्या मुलांचा गडकरींच्या खासदार क्रीडा महोत्सवात हैदोस; पंच, आयोजकांना मारहाण


नागपूरः  भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेल्या मुन्ना यादव यांच्या मुलांनी अक्षरशः हैदोस घालत पंच आणि स्पर्धेच्या आयोजकांना मारहाण केली. यादव बंधूंच्या या हैदोसामुळे गडकरींच्या क्रीडा महोत्सवाला मात्र गालबोट लागले.

 गडकरींच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा महोत्सवाअंतर्गत गेल्या दहा दिवसांपासून विविध स्पर्धा सुरू आहेत. या महोत्सवाअंतर्गत गुरूवारी छत्रपतीनगर येथील मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खामला इलेव्हन आणि स्टार इलेव्हन या दोन संघादरम्यान सामना होता. यातील एका संघामध्ये मुन्ना यादव यांची मुले करण आणि अर्जुनचा समावेश होता.

सामना सुरू असताना अर्जुन यादवने थ्रो बॉलिंगवरून पंचाशी वाद घातला. पंचांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र करण-अर्जुन या यादव बंधूंनी कोणाचेही न ऐकता आम्ही सांगतो तसाच निर्णय द्या, अशी मनमानी सुरू केली.

यादव बंधूंच्या मनमानी पुढे झुकण्यास पंचाने नकार देताच त्यांनी पंचांशी वाद घालत त्यांना आणि धावांची नोंद करणाऱ्या स्कोररला मारहाण करत मैदानावर धुमाकूळ घातला. हा धुमाकूळ सुरू झाल्यानंतर यादव बंधूंचे समर्थकही मैदानावर उतरले आणि त्यांनीही हैदोस घालण्यास सुरूवात केली.

या धुमाकुळामुळे सामना थांबवावा लागला. यादव बंधूंचा हा धुमाकूळ पाहून अन्य खेळाडू दहशतीपोटी मैदानावरून निघून गेले. या गोंधळाची माहिती स्पर्धेचे आयोजक आणि भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना देण्यात आली. या स्पर्धेत ज्यांना मारहाण झाली ते आज नितीन गडकरी यांच्याबरोबरच पोलिसांतही तक्रार देणार असल्याचे समजते.

मविआ सरकारचा होता वचकः  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खंदे समर्थक असलेल्या मुन्ना यादव यांच्या मुलांनी नागपुरात मारहाण करून उच्छाद घातल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मध्यंतरी अडीच वर्षांच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मुन्ना यादव यांच्यावर वचक होता. परंतु राज्यात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वातील समर्थक सरकार आल्यानंतर यादव बंधूंचा उच्छाद पुन्हा वाढल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!