विद्यापीठ सिनेट निवडणुकीचे सर्व निकाल जाहीरः डॉ. शंकर अंभोरे, डॉ. उमाकांत राठोड विजयी, डॉ. राजेश करपे विद्या परिषदेवर


औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयीन शिक्षक गटातून प्रा. डॉ. शंकर अंभोरे, प्रा. डॉ. उमाकांत राठोड हे विजयी झाले आहेत. तर प्रा. डॉ. राजेश करपे हे विद्या परिषदेवर निवडून गेले आहेत.

महाविद्यालयीन शिक्षक गटात अटीतटीची निवडणूक झाली. या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून डॉ. अंकुश कदम हे सर्वाधिक ४०४ मते घेऊन विजयी झाले. त्या खालोखाल डॉ. शंकर अंभोरे दुसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ४०१ मते घेऊन विदयी झाले. डॉ. मुंजा धोंगडे हे ३६६ मते घेऊन विजयी झाले. खुल्या प्रवर्गातील हे तीनच उमेदवार विजयासाठीचा निर्धारित कोटा पूर्ण करून विजयी झाले. डॉ. भगवान ढोबाळ यांना ३४९ मते तर डॉ. विक्रम खिल्लारे यांना ३४१ मते मिळाली. या दोन उमेदवारांनी कोटा पूर्ण केला नसला तरीही त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे.

महाविद्यालयीन शिक्षक गटात आरक्षित प्रवर्गातील पाच जागांवर विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते (कंसात) अशीः

अनुसूचित जाती गटः डॉ. संजय कांबळे (१ हजार ५६ मते), अनुसूचित जमाती गटः  डॉ. सतीश गावित (१ हजार २८० मते), ओबीसी गटः डॉ. रविकिरण सावंत (९९४ मते), व्हीजेएनटी गटः डॉ. उमाकांत राठोड ( ९६० मते), महिला गटः डॉ. कल्पक घारगे (१ हजार ३५ मते)

डॉ. करपे, डॉ.कराड*विद्या परिषदेवरः विद्या परिषदेच्या सर्व सहाही जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मानव्यविद्या शाखेवर प्रा. डॉ. राजेश करपे हे निवडून गेले आहेत.विजयी उमेदवारांना कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

या निवडणुकीत विद्या शाखा व प्रवर्गनिहाय निवडणूक झालेल्या जागा, विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अनुक्रमे पुढीलप्रमाणे:

मानव्यविद्या शाखाः

खुला गट: डॉ. राजेश नारायणराव करपे (१ हजार ४८४ मते), व्हीजेएनटी प्रवर्ग: डॉ. व्यंकटेश बजरंग लांब (१ हजार २५२ मते).

विज्ञान विद्याशाखा:

महिला प्रवर्ग:  डॉ. रेखा मोहन गुळवे (१ हजार २७८ मते), अनुसूचित जाती प्रवर्ग: डॉ. वैभव मुरुमकर (१ हजार २२७ मते).

वाणिज्य विद्याशाखा:  डॉ. राजेश लहाने (१ हजार २९२ मते ).

आंतरविद्या शाखा: खुला प्रवर्ग- डॉ. प्रभाकर लहुराव कराड (१ हजार १८२ मते).

या निवडणुकीत विद्यापीठ शिक्षक व महाविदृयालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु कऱ्हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य अधिकारी, कर्मचारी प्रयत्न केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!