महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला होता का? मागणी करूनही कोश्यारींना न हटवल्यामुळे सचिन सावंतांचा सवाल


मुंबईः महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्याला राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होऊन उर्वरित वेळ मनन-चिंतनात घालवण्याची इच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे बोलून दाखवली आहे. त्यांनी ही इच्छा बोलून दाखवून पाच दिवस उलटले तरी त्यांना राज्यपालपदावरून न हटवल्यामुळे विरोधकांनी मोदी सरकार आणि भाजपवर टिकास्त्र सोडले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्रात इतका आकस का? असा सवाल करत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी टीका केली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यासाठी १९ जानेवारी रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याकडे राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवली, राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली. कोश्यारींनी पदमुक्त होण्याची इच्छा बोलून दाखवूनही त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर कायम ठेवण्यात आल्यामुळे आता विरोधकांनी मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी याच मुद्यावरून मोदी सरकार आणि भाजपवर ट्विट करून टिकास्त्र सोडले आहे. ‘राज्यपालांनी थोर महापुरूषांचा सातत्याने केलेल्या अवमानामुळे महाराष्ट्रातून एकमुखाने केल्या गेलेल्या त्यांना हटवण्याच्या मागणीवर भाजप नेते केंद्राकडे बोट दाखवत राहिले. आता राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही’,  असे सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यपालांनी सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करूनही त्यांना कायम ठेवल्यामुळेही सचिन सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यपाल सातत्याने पदमुक्त करण्याची मागणी करत आहेत. तरीही त्यांना पदावरून हटवले जात नाही’याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेच्या नाकावर टिच्चून आम्ही त्यांना तिथेच ठेवणार अशी मोदी सरकार व भाजपची भावना दिसते. महापुरूषांचा अनादर भाजपच्या निर्देशानुसार केला गेला होता का? मोदी सरकारला महाराष्ट्रात इतका आकस का? जाहीर निषेध असे सावंत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 स्वेच्छेने मुक्त होऊ देऊ नका, हकालपट्टीच करा-पटोलेः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारींच्या राजकीय जबाबदाऱ्यांतून मुक्त होण्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त विधआने करत राहिल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करत आलो आहे. राज्यपाल कोश्यारी यंना स्वेच्छेने मुक्त न होऊ देता राष्ट्रपतींनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी आमची मागणी आहे,’ असे पटोले यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संवैधानिक व्यवस्थेला छेद देण्याचे काम राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

…तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल-मिटकरीः राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या पदमुक्तीच्या निर्णायवर टिकास्त्र सोडले आहे. ‘ज्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेले’,  असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

 ‘दुसरे असे की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर राज्य सरकार कोसळले तर त्याआगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल. त्यांना लवकर सुबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळे करावे,’  असेही मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!