श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले ‘जिहाद’चे धडेः काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांनी जोडला श्रीकृष्णाचा जिहादशी संबंध!


नवी दिल्लीः ‘जिहाद’च्या मुद्यावरून देशभरात अधूनमधून बरीच चर्चा आणि वादविवाद होत असतानाच ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनी श्रीकृष्णाचाच संबंध थेट जिहादशी जोडला आहे.  जिहादच्या विषयावर बरीच चर्चा होत असताना कुराण आणि भगवदगीतेतही या विषयाचा उल्लेख आढळतो. महाभारतातील गीतेच्या एका भागात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहादचे धडे दिले आहेत, असे चाकूरकर म्हणाले. चाकूरकर यांच्या या वक्तव्यावरून आता वाद पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री मोहसीना किडवई यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन गुरूवारी नवी दिल्लीत झाले. त्यावेळी चाकूरकर बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते शशी थरूर, फारूक अब्दुल्ला, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आणि मणिशंकर अय्यरही उपस्थित होते.

 असे म्हटले जाते की इस्लाम धर्मात जिहादची खूपच चर्चा आहे.जिहादचा विषय तेव्हाच येतो की जेव्हा मनामध्ये स्वच्छ विचार असूनही जर ते कुणी समजून घेत नसेल तर असे म्हटले जाते की तुम्हाला शक्तीचा वापर करण्याची गरज भासली तर केला पाहिजे. हे फक्त कुराण शरीफमध्येच नाही. ही बाब महाभारतात गीतेचा जो भाग आहे, त्यातही आहे, असे चाकूरकर म्हणाले.

जिहादची संकल्पना केवळ इस्लाममध्येच नाही तर भगवदगीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे. श्रीकृष्णाने महाभारतात गीतेच्या एका भागात अर्जुनाला जिहादचे धडे दिले होते, असेही चाकूरकर म्हणाले.

मराठवाड्यातील लातूरचे असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकर हे २००४ ते २००८ या काळात केंद्रीय गृहमंत्री राहिले आहेत. १९९१ ते १९९६ या काळात ते १० व्या लोकसभेचे अध्यक्षही होते. ते पंजाबचे राज्यपाल आणि २०१० ते २०१५ या काळात चंदीगड या केंद्र शासित प्रदेशाचे प्रशासकही राहिले आहेत.

भाजपचे टिकास्त्रः भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी चाकूरकर यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. हा गुजरात निवडणुकीपूर्वी ध्रुवीकरणाचा प्रयोग असल्याचे पूनावाला यांनी म्हटले आहे. आम आदमी पार्टीचे गोपाल इटालिया आणि राजेंद्रपाल गौतम यांच्यानंतर हिंदू घृणा आणि वोट बँकेच्या राजकारणात मागे राहिलेले नाहीत. काँग्रेसचे शिवराज पाटील म्हणतात श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला होता. काँग्रेसने हिंदू/भगवा दहशतवाद शब्दाची उत्पत्ती केली, राम मंदिराला विरोध केला, भगवान रामाच्या अस्तित्वावर सवाल उपस्थित केले आणि हिंदुत्वाची तुलना इसिसबरोबर केली, असे पूनावाला म्हणाले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!