मुख्यमंत्री फडणवीस मराठवाड्यातील शेतीच्या बांधावर, म्हणालेः सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर, खरिप व रब्बीचे नुकसान गृहित धरूनच शेकऱ्यांना सरसकट मदत!


लातूर: शासनाने दुष्काळाची परिस्थिती अतिशय गांभीर्याने घेतली आहे. शासन दुष्काळाची पहिली अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. खरिप व रब्बीचे नुकसान गृहित धरूनच शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली.

लातूर, धाराशीव जिल्ह्यातील पीक-पाणी परिस्थितीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज लातूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दुष्काळाच्या अनुषंगाने करावयाच्या आवश्यक त्या उपयोजनांबाबत शासनस्तरावर योग्य कार्यवाही सुरू आहे, असे फडणवीस म्हणाले.

दुष्काळासंदर्भातील अहवाल शासनास प्राप्त झालेले आहेत. सध्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत शासन करत आहे. सोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभही देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक तेवढा ‍निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारे पाणी, जनावरांचा चारा आदी बाबींचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पंचनाम्यात अडकवायचे नाही!

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय काढण्यात येईल आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पंचनामे केवळ कायद्यात लिहिलेले आहेत म्हणून केले जात आहेत. त्यात शेतकऱ्यांना अडकवून ठेवण्याची सरकारची इच्छा नाही. मदत सरसकटच केली जाईल. केवळ खरीपच नव्हे तर रब्बीचे नुकसान गृहित धरून शेतकऱ्यांना सरसकटच मदत केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले. लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे भेट दिल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!