बीडमध्ये एमबीएची फॅक्टरीच! एकाच व्यक्तीच्या पाच महाविद्यालयात दरवर्षी तब्बल ९६० पदव्यांचा ‘घाणा’, ‘कॉर्पोरेट’ संभाजीनगरलाही मागे टाकले!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ‘बिहार झालेले बीड’ आधी अशा नावाने आणि नंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ‘आकाचे बीड’ म्हणूनही बदनाम झालेल्या बीडची आणखी एक धक्कादायक ओळख समोर येत आहे. कुठलाही कॉर्पोरेट व्यवहार नसलेल्या बीडमध्ये एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या नावाची व्यवस्थापनशास्त्राचे धडे देणारी पाच महाविद्यालये आहेत आणि या पाच महाविद्यालयांतून दरवर्षी तब्बल ९६० विद्यार्थी एमबीएची पदवी घेऊन बाहेर पडत असल्याची आकडेवारीच न्यूजटाऊनच्या हाती लागली आहे. बीडचे हे व्यवस्थापनशास्त्रातील ‘कौशल्य’ आणि ‘कर्तृत्व’ कॉर्पोरेट छत्रपती संभाजीनगरलाही हाबाडा देणारे ठरले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील संलग्न महाविद्यालयांची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करून किमान पायाभूत सुविधा, पूर्णवेळ अध्यापकांची नियुक्ती, नियुक्ती केलेल्या अध्यापकांना अदा करण्यात आलेले वेतन आदी निकषांची पूर्तता करत नसलेल्या तब्बल १८९ महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांचे प्रवेश स्थगीत केल्याचे परिपत्रक २२ जुलै रोजी जारी केले आणि या महाविद्यालयांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ५ ऑगस्टची मुदत दिली होती.

विद्यापीठाने जारी केलेल्या या परिपत्रकात संबंधित महाविद्यालयाचे नाव, तेथे चालवले जाणारे पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि त्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची शासन मान्य प्रवेश क्षमता इत्यादी तपशीलही जाहीर केला आहे. विद्यापीठाने जारी केलेल्या या यादीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यातूनच बीडमध्ये एमबीएच्या पदव्यांची फॅक्टरीच असल्याचेही उघडकीस आले असून व्यवस्थापनशास्त्रातील बीडचे हे ‘कर्तृत्व’ कॉर्पोरेट मुखवटा असलेल्या छत्रपती संभाजीनगरलाही मागे टाकणारे आहे.

बीड शहर किंवा जिल्ह्यात कॉर्पोरेट कंपन्या किंवा फारसे उद्योगधंदे नाहीत. केंद्र सरकारच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाच्या अखत्यारितील छत्रपती संभाजीनगरातील एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या अहवालानुसार बीड जिल्ह्यात बीड, आष्टी, पाटोदा, धारूर आणि माजलगाव येथे एमआयडीसी आहेत. तर अंबाजोगाई व परळी येथे सहकारी औद्योगिक वसाहती आहेत. येथे कार्यरत असलेल्या मोठ्या आणि मध्यम उद्योगांत सर्व प्रकारची कौशल्ये मिळून एकूण रोजगार क्षमता ५ हजार ८३५ आहे. साखर कारखाने सोडले तर ‘कॉर्पोरेट’ उद्योग म्हणून ओळखला जावा असा एकही उद्योग बीड जिल्ह्यात नाही.

सुभाषचंद्र सारडा हे बीडचे एक ‘शिक्षण महर्षी’ आहेत. त्यांच्या नेतृत्वात आदित्य एज्युकेशन ट्रस्ट, प्रियदर्शिनी एज्युकेशन ट्रस्ट आणि आदित्य बहुउद्देशीय संस्था अशा विविध शिक्षण संस्था चालवल्या जातात. याच शिक्षण संस्थांच्या नावे बीडमध्ये विविध महाविद्यालये चालवले जातात. सारडा यांच्या संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या पाच महाविद्यालयांत विविध स्पेशालायजेशनचे मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एमबीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवले जातात. त्यांची एकूण प्रवेश क्षमता तब्बल ९६० एवढी आहे. म्हणजेच बीडमधून दरवर्षी तब्बल ९६० विद्यार्थी एमबीएची पदवी घेऊन बाहेर पडतात आणि तेवढेच विद्यार्थी एमबीए प्रथम वर्षाला प्रवेश घेतात.

सारडा यांच्या आदित्य एज्युकेशन ट्रस्टच्या आदित्य कॉलेज ऑफ एमबीएमध्ये एमबीए-बिझनेस मॅनेजमेंट-ची १८० आणि एमबीए-मार्केटिंग मॅनेजमेंट-ची ६० प्रवेश क्षमता आहे. आदित्य इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही एमबीए-मॅनेजमेंट सायन्स हा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. त्याची प्रवेश क्षमता १८० आहे.

सारडा यांच्या प्रियदर्शिनी एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने बीडमध्येच किशोरी कॉलेज ऑफ एमबीए चालवले जाते. या महाविद्यालयात एमबीए-फायनान्सच्या ६०, एमबीए-मॅनेजमेंट सायन्सच्या ६० आणि एमबीए-मार्केटिंग मॅनेजमेंटच्या ६० जागा आहेत. सारडा यांच्याच आदित्य बहुउद्देशीय संस्थेचे सूरज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट हे आणखी एक महाविद्यालय आहे. तेथे एमबीए-बिझनेस मॅनेजमेंटच्या ६०, एमबीए-मानव संसाधनच्या ६० आणि एमबीए-मार्केटिंग मॅनेजमेंटच्या ६० अशी एमबीएची एकूण प्रवेश क्षमता १८० आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयात एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता तब्बल ३०० आहे.

सारडा यांचेच बीडमध्ये मिठुलालजी सारडा एमबीए कॉलेजही आहे.  या महाविद्यालयात एमबीए-फायनान्सच्या ६०, एमबीए-मॅनेजमेंट सायन्सच्या ६० आणि एमबीए-मार्केटिंग मॅनेजमेंटच्या ६० अशी एकूण प्रवेश क्षमता १८० आहे. सुभाषचंद्र सारडा हे ‘शिक्षण महर्षि’ बीडमध्ये विविध संस्थांच्या नावाखाली चालवत असलेल्या विविध महाविद्यालयातील एमबीए अभ्याक्रमाची एकूण प्रवेश क्षमता ९६० एवढी आहे.

चर्चा व्यवस्थापन ‘कौशल्या’चीच

व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या अध्यापनातील बीडचे हे ‘ कर्तृत्व’ अनेक औद्योगिक वसाहती आणि त्या औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेले अनेक मोठे उद्योग, शेंद्रा पंचतारांकित एमआयडीसी, डीएमआयसी, ऑरिक सिटी अशा ख्यातकिर्त उद्योग उभारणीमुळे ‘कॉर्पोरेट’ तोंडवळा असलेल्या छत्रपती संभाजीनगरलाही मागे टाकणारे आहे. उद्योगधंद्याचे ‘कॉर्पोरेट शहर’ अशी ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध संस्थांच्या ११ महाविद्यालयांमध्ये एमबीए हे अभ्यासक्रम चालवले जातात. या ११ महाविद्यालयांची मिळून एमबीएची एकूण प्रवेश क्षमता १ हजार २६० एवढी आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरातील विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीच्या चाळणीत छत्रपती संभाजीनगरातील एमआयटी, देवगिरी महाविद्यालय, राजर्षि शाहू महाविद्यालयासारख्या नामांकित संस्था अडकल्यामुळे त्यांना एमबीएच्या प्रथम वर्षाला प्रवेशाच विद्यापीठाने २२ जुलै रोजी परवानगी नाकारली होती. परंतु या चाळणीत सारडा यांचे एकही एमबीए कॉलेज अडकले नाही. त्यामुळे त्यांचे ‘व्यवस्थापन’ कौशल्यही उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरले आहे.

एवढे पोटेन्शिअल कसे?

कुठलीच कॉर्पोरेट ओळख नसतानाही बीडसारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश कसे घेतात? बीडच्या विद्यार्थ्यांना ‘एमबीए’चा एवढा लळा कसा लागला? एवढ्या मोठ्या संख्येने दरवर्षी व्यवस्थापनशास्त्राच्या पदव्या घेऊन बाहेर पडणारे बीडचे विद्यार्थी नेमके कुठे जात असतील?, येथे प्रवेश घेणारे विद्यार्थी हे बीड जिल्ह्यातीलच असतात की बाहेरचे जिल्हे, राज्यातील विद्यार्थीही येथे येऊन व्यवस्थापनशास्त्राचे ‘कौशल्य’ आत्मसात करण्यास आसूलेले असतात?, जे ‘पोटेन्शिअल’ छत्रपती संभाजीनगरसारख्या कॉर्पोरेट तोंडवळा असलेल्या शहरातही नाही, तेवढे पोटेन्शिअल बीडमध्ये कसे? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चिले जात आहेत.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!