
नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे जंतर-मंतरवर दाखल झाले असून त्यांच्या नेतृत्वात हजारो समर्थकांच्या उपस्थितीत आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाला सुरूवात झाली आहे.
अभिजीत दिपके हे अमेरिकेहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ वर पोहोचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना जंतर-मंतरवर सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने समर्थकांना थेट जंतर-मंतरवर पोहोचण्याचे आवाहन केले. हातात पुस्तक आणि तिरंगा घेऊन जंतर-मंतरवर या, असे आवाहन अभिजीत दिपके यांनी समर्थकांना केले.
अभिजीत दिपके हे ११ वाजेच्या सुमारास जंतर-मंतरवर पोहोचताच त्यांच्या समर्थकांनी भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद आणि जय भीमच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी दिपके यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना गणवेश आणि साध्या वेषातील १० ते १५ पोलिसांनी घेरले आणि अज्ञातस्थळी नेले. त्यानंतर त्यांच्याशी आमचा कोणताही संपर्क झाला नाही, असा दावा करत कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी दिल्ली पोलिसांनी दिपकेंना अटक केल्याचा संशय व्यक्त केला होता, परंतु दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दावा फेटाळून लावला.
जंतर-मंतरवर पोहोचल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत ‘देश का युवा अब डरेगा नही, लडेगा,’ ‘नही डरेंगे नही डरेंगे’, ‘कॉक्रोच डरते भी नही,कभी मरते भी नही,’ अशा घोषणा दिल्या. दरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हजारो तरूण जंतर-मंतरवर गोळा होत असून ते शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत आहे.
