पीपीएफ, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या नियमांत शिथिलता, सेवानिवृत्तीनंतर आता तीन महिन्यात उघडता येईल खाते!


नवी दिल्लीः केंद्र सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेसह अनेक अल्पबचत योजनांच्या नियमांत शिथिलता आणली आहे. नव्या नियमांनुसार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी सध्या एक महिन्याचा असलेला कालावधी आता तीन महिन्यांचा करण्यात आला आहे.  त्यामुळे आता एखाद्या व्यक्तीला सेवानिवृत्तीच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडता येईल.

केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, एखादी व्यक्ती सेवानिवृत्तीचा लाभ मिळाल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत खाते उघडू शकेल. मुदतपूर्तीच्या तारखेला किंवा विस्तारित मुदतीच्या दिवशी योजनेसाठी निश्चित दराने व्याज दिले जाईल.

केंद्र सरकाने पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे खाते अकाली बंद करण्याबाबतही काही नियम बदलले आहेत. या योजनेला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (सुधारणा) योजना २०२३ असे संबोधले जाणार आहे. एनएसएफडी योजनेअंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.

पाच वर्षे कालावधीच्या खात्यात जमा केलेली रक्कम खाते उघडण्याच्या तारखेपासून चार वर्षांनी मुदतीपूर्वी काढल्यास पोस्ट ऑफिस बचत खात्यात लागू असलेल्या दराने व्याज देण्यात येणार आहे. सध्याच्या नियमानुसार या परिस्थितीत तीन वर्षांच्या मुदत ठेव खात्यासाठी स्वीकार्य दराने व्याज दिले जाते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!