
नवी दिल्ली: नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी कॉक्रोच जनता पार्टी सीजेपी), ६ जून रोजी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके अमेरिकेहून भारताकडे रवाना झाले आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ‘माझे भवितव्य आता संविधानाच्या हातात आहे’, असे अभिजीत दिपके यांनी दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे.
दरम्यान, आंदोलनाच्या दोन दिवस आधी गुरुवारी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) एक मोठा निर्णय घेतला आणि आपल्या समर्थकांना एक विशेष आवाहन केले आहे. अभिजीत दीपके यांच्या स्वागतासाठी ६ जून रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गर्दी न करण्याचे आवाहन सीजेपीने आपल्या समर्थकांना केले आहे.
याआधी अभिजीत दीपके यांनी त्यांच्या समर्थकांना ६ जून रोजी दिल्ली विमानतळावर येण्याचे वैयक्तिकरित्या निमंत्रण दिले होते. तथापि, या आवाहनाला त्यांच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त जनसमर्थन मिळाले आहे, असे सीजेपीने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.
विमानतळावर एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आल्याने विमानतळाच्या कामकाजात व्यत्यय येऊ शकतो आणि प्रवासी व सुरक्षा दल या दोघांचीही मोठी गैरसोय होऊ शकते. त्यामुळे सीजेपीने आपला निर्णय मागे घेतल्याचे सीजीपीने सोशल मीडियावर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे आणि ‘कृपया दिल्ली विमानतळावर येऊ नका,’असे आवाहन आपल्या समर्थकांना केले आहे.
अभिजीत दीपके यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करून समर्थकांना शिस्त पाळण्याचे आवाहन केले आहे. आपले आंदोलन हे पूर्णपणे शांततापूर्ण आणि कायदेशीर चौकटीत असले पाहिजे. आम्ही कायद्याचे पालन करणारे नागरिक आहोत. आमचे विरोधक या आंदोलनाला बदनाम करण्याची आणि हे आंदोलन उधळून लावण्याची संधी शोधत आहेत. आपण त्यांना अशी कोणतीही संधी देऊ नये, असे अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.
दिल्लीत पोहोचल्यावर अभिजीत दिपके थेट पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये जातील आणि जंतर मंतर येथील ६ जूनच्या आंदोलनासाठी वैयक्तिकरित्या पोलिसांची परवानगी मागणार आहेत. ६ जूनच्या या आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळेल की नाही, याबद्दल अजूनही अनिश्चितता आहे. हा निर्णय संघटनेच्या रणनीतीचा भाग असल्याचे सीजेपीचे नवनियुक्त प्रवक्ते विजेता दहिया यांनी म्हटले आहे.
हे आंदोलन जनभावनेतून प्रेरित आहे आणि सध्या लोक अभिजीतशी घट्ट जोडले गेले आहेत. त्यामुळेच आम्ही ठरवले आहे की, अभिजीत स्वतः ६ जून रोजी आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता पोलीस ठाण्यात जाईल, असे विजेता दहिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
प्रशासन त्यांना आपले म्हणणे मांडण्याची आणि शांततेने आंदोलन करण्याची परवानगी देईल, असा विश्वास कॉक्रोच जनता पार्टीने व्यक्त केला आहे.q
अभिजीतला अटक हा ‘टर्निंग पॉइंट’ ठरेल: दरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सीजेपीच्या जेन झी आंदोलनाला पाठिंबा दिला असून अभिजीत दिपकेंना अटक केल्यास तो या आंदोलनाचा टर्निंग पॉइंट ठरेल, असा इशारा दिला आहे. अण्णा हजारेंची अटक हा इंडिया अगेन्स्ट करप्शन चळवळीसाठी टर्निंग पॉइंट ठरला होता. त्याचप्रमाणे अभिजीत दिपकेंना अटक केल्यास तो जेन-झी आंदोलनाचा टर्निंग पॉइंट ठरेल, असे भूषण यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
