कॉक्रोच जनता पार्टीने दिली मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची हाक, पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आंदोलनासाठी भारतात परतणार!


नवी दिल्लीः सोशल मीडियावर देशातील तरूणाईचे आकर्षण ठरलेल्या आणि अवघा काही दिवसांतच इन्स्टाग्रामवर सत्ताधारी भाजपपेक्षाही जास्त फॉलोअर्स मिळवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आणि सध्या अमेरिकेत असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे या आंदोलनासाठी ६ जून रोजी भारतात परतणार असून नवी दिल्लीतील जंतरमंतरवर हे आंदोलन केले जाणार आहे. देशातील युवकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीच्यावेळी देशातील बेरोजगार तरूणांना कॉक्रोच (झुरळ) आणि परजीवी म्हटले होते. त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी या राजकीय व्यंगात्मक चळवळीची स्थापना केली. या डिजिटल पार्टीने अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स मिळवले. त्यामुळे सोशल मीडियासह जगभरात गेल्या काही दिवसांपासून कॉक्रोच जनता पार्टीचीच चर्चा सुरू आहे. ही चळवळ सोशल मीडियापुरतीच मर्यादित राहील, असा काही जणांचा कयास होता. परंतु या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केलेल्या आंदोलनाच्या घोषणेमुळे हा कयास खोटा ठरला आहे.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोमवारी स्वतःच्या आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स हँडलवर पोस्ट करून मोदी सरकारविरुद्ध पहिल्या मोठ्या जनआंदोलनाची हाक दिली आहे. देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतरवर हे आंदोलन केले जाणार असून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके हे भारतात परतणार आहेत. ‘शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी भारतात परत येणार आहे. मी भारतातील तरूणांना आवाहन करतो की, त्यांनी जंतरमंतरवरील शांततापूर्ण आंदोलनात सहभागी व्हावे आणि सरकारकडून उत्तरदायीत्व मागण्याच्या आपल्या घटनात्मक अधिकाराचा वापर करावा,’ असे अभिजीत दिपके यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तत्पूर्वी कॉक्रोच जनता पार्टीच्या एक्स आणि इन्स्टाग्राम हँडलवरूनही ‘महत्वाची घोषणा’ असे ध्यानाकर्षित करत या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. ‘सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी ६ जून रोजी भारतात परतणार आहेत,’ असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टसोबत अभिजीत दिपके यांचा एक व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे.

 ‘आता वेळ आली आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या मार्गाने शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवला पाहिजे. जर आपण सर्वांनी मिळून आवाज उठवला तर त्यांना आपला आवाज ऐकावाच लागेल, असे अभिजीत दिपके यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. मी शनिवारी ६ जून रोजी सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचणार आहे. तिथून आम्ही सर्वजण संसदेच्या जवळ असलेल्या पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात जाऊ. तिथे जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

जबाबदारी स्वीकारण्यास नकार म्हणून आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीने नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यासाठी ऑनलाइन पीटीशनची मोहीमही राबली होती. ‘तुम्ही राजीनाम्याच्या मागणीसाठी आमच्या याचिकेवर सह्या केल्या, पण ८ लाख सह्या होऊनही ते जबाबदारी स्वीकारण्यास नकार देत आहेत. आपल्या सोशल मीडियावरील चळवळीचे शांततापूर्ण आंदोलनात रूपांतर करण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही विमानतळावर अभिजीतला भेटू शकता आणि तिथून आपण सर्वजण मिळून जंतर मंतर येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी परवानगी मागण्याकरिता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनला जाऊ, असे कॉक्रोच जनता पार्टीच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

नीट, सीबीएसई, सीयूईटी आणि एसएससी जीडी मधील १ कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. काहींनी आपले प्राण गमावले आहेत. कोणतीही जबाबदारी निश्चित केली गेली नाही. हे आता संपले पाहिजे.आपले संविधान आपल्याला शांततापूर्ण मार्गाने आवाज उठवण्याचा हक्क देते आणि आपण नेमके तेच करणार आहोत. ही चळवळ तुमची आहे, असे सांगत देशातील युवकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!