आता ड्रेसकोडचा वादः संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर भाजपचे ‘कमळ’ चिन्ह, विरोधकांचा आक्षेप!


नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने बोलावलेले १८ सप्टेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असतानाच आता संसदेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडचा वाद सुरू झाला आहे. संसदेतील कर्मचाऱ्यांना भाजपची निवडणूक निशाणी ‘कमळ’ चिन्ह असलेले जॅकेट्स गणवेश म्हणून देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला असून हे अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचे फुलच का? राष्ट्रीय पक्षी मोर किंवा राष्ट्रीय प्राणी वाघ का नाही? असा सवाल काँग्रेसने केला आहे.

लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या निर्देशानुसार, संसदेतील सुरक्षा कर्मचारी, अधिकारी, चेंबर अटेंडेंट आणि चालक यांचे गणवेश बदलण्यात आले आहेत. नव्या संसद भवनात १८ सप्टेंबरपासून विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी हे गणवेश या कर्मचाऱ्यांना परिधान करायचे आहेत.

नव्या ड्रेसकोडनुसार संसदेतील अधिकाऱ्यांना बंद गळ्याच्या सूटच्या जागी गुलाबी रंगाचे जॅकेट घालावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना खाकी पँट आणि शर्ट असा ड्रेस देण्यात आला आहे. त्यावर कमळाच्या फुलाचे डिझाइन आहे. लोकसभा आणि राज्यसभेतील मार्शल्सना ड्रेसकोड म्हणून मणीपुरी पगडी देण्यात आली आहे तर संसदेच्या सुरक्षा रक्षकांना लष्करी गणवेशाप्रमाणे गणवेश देण्यात आला आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी साडी, ब्लाऊज आणि जॅकेट असा ड्रेसकोड निश्चित करण्यात आला आहे. या जॅकेटवरही कमळाच्या फुलाचे डिझाइन आहे.

संसदेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडवर भाजपची निवडणूक निशाणी ‘कमळा’चे फुल प्रिंट करण्यात आले आहे, त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसने सरकारच्या या निर्णयावर टिकास्त्र सोडले आहे. भाजप संसदेला स्वतःचे व्यासपीठ म्हणून देशासमोर आणू इच्छित आहे, असा आरोप काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी केला आहे.

संसदेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडवर आपला राष्ट्रीय प्राणी वाघ किंवा राष्ट्रीय पक्षी मोराचे चित्र का नाही? त्यावर कमळाचेच फुल का?  मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना विचारू इच्छितो की, आपल्या सभागृहाची पातळी इतकी का घसरली आहे? असा सवालही टागोर यांनी केला आहे. भाजपने गणवेशावर कमळाचे फुल आणून घाणेरडे राजकारण केले आहे, असा आरोपही टागोर यांनी केला आहे.

लोक त्यांच्या तोंडावर चिखल लावणार आहेत, राऊतांचे टिकास्त्र

संसदेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेसकोडच्या वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी टिकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारला संसदेतील कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर कमळाचे फुल लावू द्या, मात्र २०२४ च्या निवडणुकीत जनता पूर्ण चिखल लावणार आहे. हे बनावट कमळ लावून काहीही होणार नाही, लोक यांच्या तोंडावर चिखल लावणार आहेत, असे खा. राऊत यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!