‘आपणाला काय बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं…’ मराठा आरक्षणप्रश्नी पत्रकार परिषदेपूर्वीचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ व्हायरल


मुंबईः महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीची प्रमाणपत्रे द्या, या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून या तिघांनाही सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. ‘आपणाला काय बोलून मोकळं व्हायचं ना…’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्हिडीओत बोलताना ऐकू येत आहे. या व्हिडीओवरून मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारची अनास्था स्पष्ट झाल्याची टीका होऊ लागली आहे.

मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसल्यानंतर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला सुरूवात होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओतील संवाद असा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेः ‘…नाही आपण बोलून मोकळं तर व्हायचं ना..बोलून मोकळं बोलायचं अन् निघून जायचं, हाय ना’

उपमुख्यमंत्री अजित पवारः ‘हो… येस’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसः ‘माईक चालू आहे…’

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार या तिघांनाही ट्रोल केले जात आहे. विशेष म्हणजे मंगळवारीच संभाजी भिडे यांनी आंतरवाली सराटी येथे जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवाडी करणार नाहीत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमची फसवणूक करणार नाहीत, अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, असे मनोज जरांगे पाटील यांना सांगितले होते. भिडेंच्या या वक्तव्याचा संदर्भ देऊन या तिघांवरही टीका केली जात आहे.

या संवादाचा व्हिडीओ ट्विट करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. सरकारला फक्त बोलून मोकळं व्हायचं आहे. जनतेच्या प्रश्नांना-समस्यांना उत्तरे द्याचे नाहीत. अडचणीच्या प्रश्नांपासून पळवाट शोधणारे ‘नाकर्ते सरकार’ राज्याचा कारभार हाकत आहे, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले आहे.

आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगाः ओमराजे

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे, असे ट्विट ओमराजे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन-मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करत असताना सरकारचे हे ट्रिपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय, असेही ओमराजे यांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!