नवी दिल्लीः हिंदी सिनेमासृष्टीवर अमिट छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली.
वहिदा रेहमान यांची भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीच्या प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे, हे जाहीर करताना मला खूप आनंद होत असून सन्मानाची भावना आहे. गेल्यावर्षी हा मान ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मिळाला होता आणि आता वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जाहीर केले आहे.
वहिदा रेहमान या जुन्या काळातील चतुरस्त्र अभिनेत्री असून त्यांनी देव आनंद, गुरूदत्त यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे. करिअरच्या दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी चरित्र भूमिकाही मोठ्या ताकदीने साकारल्या आहेत. रंग दे बसंती सिनेमातील मिसेस राठोड असो की ओम जय जगदीश सिनेमातील सरस्वतीदेवी बत्रा या सगळ्याच भूमिका त्यांनी ताकदीने साकारल्या आहेत. आपल्या वहिदा रेहमान यांनी प्रत्येक कलाकृतीत विविधरंगी अभिनयाचे रंग भरले आहेत.
वहिदा रेहमान यांनी पाच दशकांहून अधिक काळ सिनेमासृष्टीत कारकीर्द गाजवली आहे. प्यासा, कागज के फूल, चौदवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, गाईड, खामोशी अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी चोखंदळपणे भूमिका साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकांसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल वहिदा रेहमान यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
वहिदा रेहमान यांनी त्यांची कारकीर्द तामिळ आणि तेलगू चित्रपटापासून सुरू केली. मात्र त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती हिंदी चित्रपटांतील अभिनयांमुळेच. १९५६ मध्ये आलेला ‘सीआयडी’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. ‘गाईड’, ‘प्यासा’ आणि ‘कागज के फूल’ हे आपले आवडते चित्रपट असल्याचे वहिदा रेहमान यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.