भाजप खासदाराने भरसंसदेत बसप खासदाराला ‘भडवा’, ‘कटवा’, ‘मुल्ला आतंकवादी’ अपशब्द वापरले, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया


नवी दिल्लीः भाजपचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांनी गुरुवारी लोकसभेत भारतीय सांसदीय परंपरेच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या. गुरूवारी भरलोकसभेत खा. रमेश बिधुडी यांनी बसप खासदार दानिश अली यांच्यासाठी ‘मुल्ला उग्रवादी’, ‘मुल्ला आतंकवादी’ ‘भडवा’ आणि ‘कटवा’ (खतना केलेला) असे आक्षेपार्ह अपशब्द वापरले. खा. बिधुडी हे अपशब्द वापरत असताना भाजपचे अन्य खासदार दात विचकटून हसत होते. दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या खासदाराच्या या ‘कर्तृत्वा’बद्दल नंतर खेद व्यक्त केला. परंतु खा. बिधुडी यांच्याविरोधात देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

गुरूवारी लोसकभेत चांद्रयान-३ च्या यशस्वितेवरील चर्चेदरम्यान भाजपचे दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधुडी यांनी उत्तर प्रदेशातील अमरोहा लोकसभा मतदारसंघाचे बसप खासदार दानिश अली यांच्यासाठी हे आक्षेपार्ह शब्द वापरले. विशेष म्हणजे खा. रमेश बिधुडी यांचे मानसिक संतुलन ढळून एवढे चिडण्यासारखा कोणताही मुद्दा खा. दानिश अली यांनी उपस्थित केला नव्हता. उत्तर भारतातील हिंदी भागात भडवा आणि कटवा हे शब्द आक्षेपार्ह मानले जातात आणि हे शब्द शिविगाळ या श्रेणीत मोडतात. संसदेत आजपर्यंत कोणत्याही खासदाराने दुसऱ्या खासदारासाठी एवढ्या खालच्या पातळीचे शब्द वापरले नाहीत.

भाजप खासदार रमेश बिधुडी हे जेव्हा खा. दानिश अली यांच्यासाठी हे आक्षेपार्ह अपशब्द वापरत होते, तेव्हा भाजपचे काही खासदार दात विचकटून हसत होते आणि त्यांच्यापैकी कुणीही खा. रमेश बिधुडी याना रोखण्याचा प्रयत्न केला नाही. खा. रमेश बिधुडी जेव्हा ही टिप्पणी करत होते, तेव्हा काँग्रेस खासदार के. सुरेश हे अध्यक्ष होते, त्यांनी ही टिप्पणी रेकॉर्डवरून काढून टाकण्याचे आदेश दिले.

भाजप खासदार रमेश बिधुडी यांची ही आक्षेपार्ह टिप्पणी समोर आल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या ‘आक्षेपार्ह’ टिप्पणीबद्दल खेद व्यक्त केला. ‘आपण बिधुडी यांची टिप्पणी ऐकलेली नाही आणि जर विरोधी सदस्यांच्या भावना दुखावल्या असतील तर ती टिप्पणी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची विनंती अध्यक्षांना केली आहे. बिधुडी यांच्या टिप्पणीमुळे विरोधी पक्षाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो,’ असे राजनाथ सिंह म्हणाले.

दरम्यान, बिधुडी यांनी वापरलेल्या या आक्षेपार्ह शब्दांमुळे सोशल मीडियावर बिधुडी यांच्यासह भाजपची जोरदार छिथू केली जात आहे. असंख्य राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य लोकांनाही खा. बिधुडी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. बिधुडी यांच्या वर्तनाबद्दल अध्यक्ष आणि भाजपवरही टिकास्त्र सोडले जात आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विटरवर भाजप खासदार रमेश बिधुडी यांचा व्हिडीओ शेअर केला आहे. भाजप खासदार रमेश बिधुडी यांनी काल रात्री लोकसभेत खासदार दानिश अलींना ‘भडवा’ (दलाल), ‘कटवा’ (खतना केलेला), ‘मुल्ला आतंकवादी’ आणि ‘मुल्ला उग्रवादी’ म्हटले. सर्व रेकॉर्डवर आहे. मर्यादांचे तारणहार ओम बिर्ला, विश्वगुरू नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गोदी मीडिया, काही कारवाई? असे ट्विट खा. मोईत्रा यांनी केले आहे.

मुस्लिम, ओबीसींना शिव्या देणे हा भाजपच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. बहुतांश लोकांना आता त्यात चुकीचे काहीच वाटत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय मुस्लिमांना आपल्याच धरतीवर अशा पद्धतीच्या दहशतीच्या स्थितीत राहण्यास बाध्य केले आहे. त्यामुळे ते सर्वकाही हसून सहन करतात. मला क्षमा करा, पण मी हे बोलत आहे. मां कालीने माझा कणा ताठ ठेवला आहे, असे खा. महुआ मोईत्रा यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!