मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लवकरच डच्चू मिळण्याची शक्यता असल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी कारणही सांगितले आहे. राणेंनी त्यांच्या खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला राणेंनी पुन्हा सेवेत घेतले. त्या अधिकाऱ्याने दोन तरूणींची फसवणूक करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार त्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे नारायण राणेंनाही लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.
राणेंना त्यांच्याच खात्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे दिल्ली सोडून ते जिल्हा नियोजनच्या बैठकीला येऊन बसतात. त्यांच्या खात्यातील एका निवृत्त अधिकाऱ्याला नारायण राणेंनी पुन्हा सेवेत घेतले. त्या अधिकाऱ्याने पदाचा दुरूपयोग करून नारायण राणेंच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार केला, असे विनायक राऊत यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.
राणेंनी पुन्हा सेवेत घेतलेल्या त्या निवृत्त अधिकाऱ्याने दोन तरूणींची फसवणूक करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्या अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे राणेंनांही लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे, असा दावाही खा. विनायक राऊत यांनी केला आहे.
…तर अडीच लाख मतांनी राणेंचा पराभवः केंद्रीय मंत्री नारायण राणे हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, नारायण राणे लोकसभा निवडणुकीला उभा राहिले तर अडीच लाख मतांनी त्यांचा पराभव करण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.
भाजप-शिंदे गटाची पिछेहाटः इंडिया टुडे- सी व्होटरच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आणि शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीत मोठी पिछेहाट होईल, असे हे सर्वेक्षण सांगते. त्याबाबत विचारले असता, ३४ मतदारसंघांची यादी आपण पाहिलेली नाही. पण कार्यकर्त्यांच्या विश्वासावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा उमेदवारी देतील, अशी अपेक्षा असल्याचे राऊत म्हणाले.