शिवसेना पक्ष व चिन्हाचा वाद सुप्रीम कोर्टात, ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका, शिंदे गटाचेही कॅव्हेट!


नवी दिल्लीः शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ठाकरे गटाची याचिका दाखल होण्यापूर्वीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले असून याबाबत कोणताही निर्णय घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता. त्यावर प्रदीर्घ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आज याचिका दाखल केली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली असली तरी सर्वोच्च न्यायालयाने ती अद्याप दाखल करून घेतली नसल्याची माहिती आहे. आजच्या लिस्टेड मेन्शनिंगमध्ये ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नव्हता. न्यायालयाने ठाकरे गटाला उद्या या याचिकेसंदर्भात मेन्शनिंग करण्यास सांगितले आहे. या मेन्शनिंगनंतरच याचिका दाखल करून घ्यायची की नाही, याबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असे सांगितले जात आहे.

शिंदे गटचे आधीच कॅव्हेटः दरम्यान, ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्याआधीच शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता असून त्या याचिकेवर कोणताही निर्णय घेण्याआधी आमचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी या कॅव्हेटमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाची याचिका दाखल करून घेताना सर्वोच्च न्यायालयाला शिंदे गटाची बाजूही ऐकून घ्यावी लागणार आहे. मंगळवारी दोन्ही बाजूंनी याबाबत युक्तिवाद केला जाण्याची शक्यता आहे.

विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाकडे: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर मुंबईतील विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्याच्या हालचाली शिंदे गटाने लगेच सुरू केल्या. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा आज ताबा घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!