जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचे देवेंद्र फडणवीस हेच सूत्रधारः मराठा महासंघाचा गंभीर आरोप


मुंबईः जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेले अत्याचार रोखण्यात राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरल्याने किंबहुना या मागील सूत्रधार फडणवीसच असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आहेत. ते मुख्यमंत्री असताना हा अन्याय, अत्याचार होतोच कसा? अशी हिम्मत पोलिस खाते करतेच कसे? या हिंसाचाराची कल्पना गृहमंत्र्यांना नव्हती का? असे अनेक प्रश्न निर्माण होत असून पुरूष आंदोलकांसोबत महिला व लहान मुलांवर लाठीचार्ज झाला हे पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला तडा देणारे कृत्य आहे, असे अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी राज्यात काही शक्ती कार्यरत आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला आव्हान देणारे कुणाचे समर्थक आहेत, हेही जगाला माहीत आहे. या सर्व प्रकाराला देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार आहेत, असा आरोपही जगताप यांनी केला आहे.

मुंबईच्या आदेशानेच आंदोलकांवर लाठीचार्जः शरद पवार

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंतरवली सराटीत जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्याआधी त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींचीही विचारपूस केली. मुंबईहून आदेश आल्यामुळेच पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा घणाघाती आरोप शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मी आंदोलकांशी संवाद साधला असता त्यांनी पोलिसांना मुंबईहून फोन आल्याचे सांगितले. आंदोलनातून काहीतरी मार्ग निघेल, अशी चर्चा सुरू होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना पोलिसांना मुंबईहून सूचना मिळाल्यामुळे त्यांचा विचार बदलला. त्यानंतर थेट आंदोलकांवर लाठीमार करण्यात आल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

मराठा नेते सरकाळपासूनच आंतरवलीत

शुक्रवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि जखमी मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी शनिवारी सकाळपासूनच मराठा समाजाचे नेते आंतरवली सराटीत दाखल झाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे भोसले, जयंत पाटील, राजेश टोपे यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *