छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): ८०० वर्षे जुन्या जुम्मा मशिदीत मुस्लिम समुदायाला नमाज पढण्यावर बंदी घालणारा जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी जारी केलेल्या मनमानी आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ही मशीद आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एम. जोशी यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी (१८ जुलै) रोजी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाला दोन आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी १८ जून रोजी मशिदीत नमाज पढण्यावर बंदी घालणारा आदेश जारी केला होता.
खंडपीठाच्या या आदेशानंतर जुम्मा मशीद ट्रस्टने या मशिदीवर पुन्हा नियंत्रण मिळवले असून आता मुस्लिम समुदायाला या मशिदीत पूर्वीप्रमाणे नमाज अदा करता येणार आहे. मुस्लिम समुदायासाठी हा मोठा दिलासा आहे.
उच्च न्यायालयाने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती देतानाच या मशिदीच्या चाव्या जुम्मा मशीद ट्रस्ट समितीकडे सोपवण्याचेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे ८०० वर्षे जुनी असलेली जुम्मा मशीद पुन्हा एकदा मुस्लिम समुदायासाठी खुली असणार आहे, असे जुम्मा मशीद ट्रस्टचे वकील एस.एस. काझी यांनी म्हटले आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील जुम्मा मशीद ही वक्फ बोर्डाअंतर्गत नोंदणीकृत संपत्ती आहे. ही मशीद पांडववाडा मशीद म्हणूनही ओळखली जाते. या वर्षीच्या मे महिन्यापर्यंत कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय ही मशीद व्यवस्थित सुरू होती. परंतु पांडववाडा संघर्ष समिती नावाच्या एका अनोंदणीकृत संघटनेने तक्रार केल्यामुळे कित्येक शतके जुनी असलेली ही जुम्मा मशीद वादाचे कारण बनली.
पांडववाडा संघर्ष समितीचे प्रसाद मधुसुदन दंडवते यांनी मे महिन्याच्या मध्यास जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या समक्ष एक याचिका दाखल केली होती. एका हिंदू धार्मिक स्थळाच्या जागेवर जुम्मा मशीद बेकायदेशीररित्या बांधण्यात आली आहे, असा दावा करत राज्य सरकारने ही मशीद ताब्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य असलेले दंडवते यांनी या याचिकेत म्हटले होते.
या याचिकेवर जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १८ जून रोजी अंतरिम प्रतिबंधात्मक आदेश जारी केला होता. निष्पक्ष सुनावणीची संधी न देताच जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केल्याचा आरोप जुम्मा मशीद ट्रस्टच्या सदस्यांनी केला होता. त्यानंतर जुम्मा मशीद ट्रस्टने जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदनही दिले होते.
त्यानंतर जुम्मा मशीद ट्रस्टने जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. वक्फ बोर्डाच्या संपतीच्या वैधतेबाबत निर्णय घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कोणतेही अधिकार क्षेत्र नाही. कारण जुम्मा मशीद ही वक्फ बोर्डाकडे नोंदणीकृत संपत्ती आहे, असा युक्तीवाद वक्फ बोर्डाच्या वकिलांनी केला.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला दोन आठवडे स्थगिती दिली आहे. खंडपीठाच्या या आदेशामुळे या मशिदीत पुन्हा नमाज अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
का म्हणतात जुम्मा मशिदीला पांडववाडा मशीद?
एरंडोल येथील ८०० वर्षे जुनी जुम्मा मशीद पांडववाडा मशीद म्हणूनही ओळखली जाते. महाभारतातील मध्यवर्ती पात्रे असलेल्या पांडवांनी त्यांच्या वनवासातील काही महिने एरंडोल येथे घालवली होती, अशी एक दंतकथा असून ‘पांडव’ हे नाव त्या दंतकथेला सूचित करते. तर महाराष्ट्रात मोकळ्या अंगणाच्या आसपास बांधलेल्या मोठ्या, दुमजली पारंपरिक निवास्थाला ‘वाडा’ असे म्हटले जाते. त्या संदर्भाने या मशिदीला पांडववाडा मशीदही म्हटले जाते, असे जुम्मा मशीद ट्रस्टचे सदस्य अल्ताफ खान यांनी म्हटले आहे.