दिल्लीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस होणार ‘बेघर’, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावल्याने करावा लागणार बंगला रिकामा?

नवी दिल्लीः भारत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेससह कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (भाकप) आणि तृणमूल काँग्रेस या तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यामुळे  भाकप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेले बंगले रिकामे करण्याचे फर्मान केंद्र सरकार काढू शकते तर तृणमूल काँग्रेसला दिल्लीत पक्ष कार्यालय उघडण्यासाठी दिलेल्या जमिनीवरील ताबाही सोडावा लागू शकतो. असे झाल्यास शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत बेघर होऊ शकते.

दिल्लीतील १ कॅनिंग रोडवर राष्ट्रवादी काँग्रेसला पक्ष कार्यालय उघडण्यासाठी बंगला देण्यात आला आहे. माकपला पुराना किला रोडवरील टाइप-७ बंगला देण्यात आला आहे. भारत निवडणूक आयोगाने या दोन्ही पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यामुळे केंद्र सरकार आता कारवाईच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन्ही पक्षांना पक्ष कार्यालयासाठी दिलेले बंगले रिकामे करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

तृणमूल काँग्रेसला दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी दीनदयाळ उपाध्याय मार्गावर १ हजार ८ चौरस मीटरची जमीन देण्यात आली होती. जमिनीचे वाटप होऊन नऊ वर्षे उलटली तरी तृणमूल काँग्रेसने त्या जमिनीचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे तृणमूल काँग्रेसला आता जमीन मिळण्याची शक्यता कमीच आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्लीत त्यांच्या पक्ष कार्यालयासाठी अनेक ठिकाणी जमिनी पाहिल्या आहेत. त्यापैकी एक जमीन निश्चित केली होती आणि त्यासाठीचे शुल्कही भरले होते. त्यामुळे बंगला रिकामा करावा लागला तरी राष्ट्रवादी काँग्रेस निश्चित केलेल्या जमिनीवर पक्ष कार्यालय बांधू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाकपला बंगला रिकामा करावा लागणार असला तरी कोटला मार्गावर पक्षाला १९६७ मध्ये देण्यात आलेल्या ०.३ एकर जमिनीवर असलेल्या सेंट्रल ऑफिस इमारतीतील पक्ष कार्यालय मात्र सुरक्षित राहणार आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला जमीन दिली आणि त्यांनी त्या जमिनीवर एकदा पक्ष कार्यालय बांधल्यानंतर त्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला तरी ती जागा त्यांच्या ताब्यातच राहते, असे केंद्रीय गृहनिर्माण नगरविकास मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!