‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात मृत्यूचे तांडव, ११ जणांचा उष्माघाताने मृत्यू, ५ जण अत्यवस्थ;  ४० जणांवर उपचार सुरू


मुंबईः शिंदे- फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करून आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात  आज मृत्यूचे तांडव पहायला मिळाले. या कार्यक्रमात उष्माघाताने ११ जणांचा नाहक बळी गेला. नवी मुंबईतील विविध रुग्णालयात जवळपास ४० जणांवर उपचार सुरू असून त्यापैकी  चार ते पाच जण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे.

पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांना या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. शिंदे- फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करून आज नवी मुंबईतील खारघर येथील मैदानावर या पुरस्कार वितरण सोहळ्याचे जंगी आयोजन केले होते. ऐन उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात  सुमारे २० लाखांचा जनसमुदाय या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी एकत्र आणण्यात आला होता. मात्र रखरखत्या उन्हात तब्बल सहा तास बसावे लागल्यामुळे शेकडो लोकांना उष्माघाताचा त्रास जाणवला. उष्माघाताचा फटका सहन न झाल्यामुळे ११ जणांचा बळी गेला. तर नवी मुंबईतील पनवेल परिसरातील विविध रुग्णालयात जवळपास ४० जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी चार ते पाच जण अत्यवस्थ आहेत.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत खारघर येथील मैदानावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. आपल्या गुरूला हा पुरस्कार देताना पाहण्यासाठी जवळपास २० लाख श्री सदस्य खारघरच्या मैदानावर जमले होते. आज ४२ अंश सेल्सिअस तापमान असताना या श्री सदस्यांना तब्बल सहा तास रखरखत्या उन्हात बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे शेकडो जणांना उष्माघाताचा फटका बसला.

उष्माघाताचा फटका बसल्याने अनेक श्री सदस्य कार्यक्रम स्थळीच बेशुद्ध पडू लागले होते. परिणामी कार्यक्रम सुरू असतानाच एकापाठोपाठ एक अम्बुलन्सचे सायरन वाजू लागले होते. श्री सदस्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात येत होते.

 हा कार्यक्रम संपण्यास दुपारचे दीड वाजले. कार्यक्रम संपल्यानंतर हा जनसमुदाय खारघर परिसरातून बाहेर पडण्यास पुढचे दीड-दोन तास लागले. उपस्थित जनसमुदायाला कार्यक्रमाच्या ठिकाणी प्यायला पुरेसे पाणीही मिळाले नाही. प्यायचे पाणी कमी पडल्यामुळे अनेक श्री सदस्य जागोजागी भोवळ येऊन पडत होते. त्यांना रेल्वे स्थानकाकडे चालत जाणेही कठीण झाले होते.

उष्माघाताचा फटका बसल्यामुळे काही श्री सदस्य जागेवरच गतप्राण झाले. तर अन्य जवळपास ३८ ते ४० जणांना वाशी, कळंबोली, खारघर येथील विविध रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. यापैकी अनेक जण अत्यवस्थ झाले होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत ११ जणांचा बळी गेल्याची माहिती समोर आली. आणखी चार ते पाच जण अत्यवस्थ असल्याचेही सांगण्यात आले.

मृतांची माहिती सांगण्यास टाळाटाळ

या कार्यक्रमात उष्माघातामुळे नेमके किती जण मृत्युमुखी पडले याची निश्चित अशी माहिती देण्यास सरकारी यंत्रणांकडून टाळाटाळ केली जात होती. श्री सदस्यांना कुठल्याच प्रकारची माहिती मिळत नसल्यामुळे अनेक नातेवाईक संभ्रमात पडले होते. मृतांचा नक्की आकडा किती हे रविवारी रात्री उशिरापर्यंत सरकारी यंत्रणांनी स्पष्ट केले नाही.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या काही श्री सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणवली होती. त्यात सात ते आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. २४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारतर्फे केली जाणार आहे. उपचार सुरू असलेल्या श्री अनुयायांचा खर्चही सरकार करणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. नंतर शिंदे यांनी ट्विट करून या कार्यक्रमात ११ जणांचा बळी गेल्याची कबुली दिली.

राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा-काँग्रेस

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात नाहक बळी गेले. त्यास जबाबदार धरून राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा कार्यक्रम भर दुपारी उन्हात ठेवण्यात आला होता. या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाण दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक लोक गंभीर आहेत. हा सरकारने केलेला मनुष्यवधच आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!