डॉ. नाईकांच्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधात चक्क ८८ टक्के ढापाढापी, तरीही ‘बलभीम’च्या छानवालांनी उठवली ‘मूळ संशोधना’ची मोहोर!


छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये पीएच.डी. या सर्वोच्च पदवीसाठी केले जाणारे संशोधन किती ‘दर्जेदार’ आणि ‘गुणवत्तापूर्ण’ असते याची एकापेक्षा एक धक्कादायक उदाहरणे न्यूजटाऊनच्या संशोधनात हाती लागली आहेत.  ६० टक्क्यांपासून ते ९४-९८ टक्क्यांपर्यंत वाङ्मयचौर्य असूनही पीएच.डी.च्या पदव्या धडाधड प्रदान केल्या जाऊ लागल्यामुळे पीएच.डी.साठी केले जाणारे संशोधन ही उच्च शिक्षण क्षेत्रातील व्हाईट कॉलर सामूहिक गुन्हेगारी तर नाही ना? अशी शंका येऊ लागली आहे. पीएच.डी.च्या शोधप्रबंधात ८८ टक्के वाङ्मयचौर्य असूनही अशाच एका महाभाग संशोधकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘विद्यावाचस्पती’ म्हणून गौरवले आहे.

पीएच.डी.च्या शोधप्रबंधात तब्बल ९४ टक्के वाङ्मयचौर्य असूनही कोणतीही पडताळणी न करताच अतिश राठोड या महाभाग संशोधकाला विनाअडथळा वाणिज्य विषयातील पीएच.डी. ही उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान केल्याचा भंडाफोड  न्यूजटाऊनने रविवारी (१९ मे) केल्यानंतर उच्च शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दंभस्फोटामुळे नैतिकतेची चाड असणारे जनमानस तर थक्कच झाले आहे. आणखी एका महाभाग संशोधक छात्राच्या शोधप्रबंधात ८८ टक्के वाङ्मयचौर्य म्हणजेच ढापाढापी असूनही त्याला २०१७ मध्ये वाणिज्य विषयातच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आल्याचे न्यूजटाऊनच्या संशोधनात उघड झाले आहे. ते प्रकरण असे-

हेही वाचाः पीएच.डी.च्या शोधप्रबंधात तब्बल ९४ टक्के वाङ्मयचौर्य, तरीही प्रदान झाली सर्वोच्च पदवी! वाचा महाभाग ‘विद्यावाचस्पती’चा प्रताप!

वाणिज्य विद्या शाखेचे विद्यार्थी डॉ. दीपक चंद्रकांत नाईक यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘Socio Economic Development of Child Labours working in Garages & Workshops in Mumbai Metropolitan City’  म्हणजेच ‘मुंबई महानगरातील गॅरेज आणि वर्कशॉपमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांचा सामाजिक-आर्थिक विकास’ या विषयावर पीएच.डी. साठी संशोधन करण्यास मंजुरी दिली. डॉ. दीपक नाईक यांनी बीडच्या बलभीम कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक आणि वाणिज्य विषयाचे विभागप्रमुख डॉ. आय.एल. छानवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘संशोधन’ पूर्ण करून २०१७ मध्ये आपला शोधप्रबंध सादर केला.  विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्राकडे त्यांनी डीव्हीडी स्वरुपात आपल्या शोधप्रबंधाची सॉफ्ट कॉपी सादर केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ६ मार्च २०१७ रोजी त्यांना वाणिज्य विषयातील ‘विद्यावाचस्पती’ म्हणजेच पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी प्रदान केली. डॉ. दीपक नाईक यांचा हा शोधप्रबंध १३ मार्च २०१९ रोजी म्हणजेच यूजीसीचा २०१८ चा वाङ्मयचौर्य प्रतिबंधक नियम अस्तित्वात आल्यानंतर आठ महिन्यांनी शोधगंगावर अपलोड करण्यात आला.

हेही वाचाः ‘प्लॅगारिझम’ शोधणाऱ्या प्रगत तंत्रज्ञानालाही पीएच.डी.च्या संशोधक छात्रांचा चकवा, ‘अशी’ शक्कल लढवून केली जात आहे सर्रास दिशाभूल!

या पीएच.डी.च्या शोधप्रबंधात ‘आपण केलेले हे संशोधन मूळ संशोधन कार्य’ असल्याचे डॉ. दीपक नाईक यांनी उद्घोषित केले. आणि ‘श्री. दीपक चंद्रकांत नाईक यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली केलेले हे संशोधन वास्तविक आणि मौलिक संशोधन कार्य आहे,’ अशी मोहोरे उठवत त्यांचे मार्गदर्शक डॉ. आय.एल. छानवाल यांनी त्यांना ‘मूळ संशोधन कार्या’चे कार्याचे प्रमाणपत्र बहाल करून टाकले. विशेष म्हणजे डीव्हीडीच्या स्वरुपात सॉफ्ट कॉपी सादर केलेल्या संशोधनातील वाङ्मयचौर्य ज्ञानस्रोताच्या पडताळणीतूनही निसटले.

ज्या अर्थी एखादा रिसर्च गाईड म्हणजेच संशोधन मार्गदर्शक एखाद्या संशोधक छात्राने पीएच.डी. साठी केलेले संशोधन कार्य हे मूळ स्वरुपातील आणि मौलिक असल्याचे प्रमाणित करतो, त्या अर्थी त्या संशोधन मार्गदर्शकाने पीएच.डी.चा तो शोधप्रबंध वाचून, पडताळूनच प्रमाणित केलेला असेल, असे गृहित धरले जाते. परंतु शपथेवर उद्घोषणा आणि संशोधन मार्गदर्शकाचे प्रमाणिकरण झालेल्या डॉ. दीपक नाईकांच्या शोधप्रबंधातच केवळ १२ टक्केच मूळ संशोधन कार्य असल्याचे आढळून आले आहे.

हेही वाचाः यूजीसीकडून कठोर निर्बंध लादूनही पीएच.डी. च्या प्रबंधात सर्रास साहित्य चोरी, बहुतांश प्रबंधात ५० ते ९४ टक्क्यांपर्यंत चौर्यकर्म!

डॉ. दीपक नाईक यांचा पीएच.डी.च्या शोधप्रबंधाची ‘टर्निटीन’ या प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने वाङ्मयचौर्याची पडताळणी करणाऱ्या वेबटूलद्वारे न्यूजटाऊनने २४ फेब्रुवारी २०२४ रोजी पडताळणी केली. या झाडाझडतीत डॉ. दीपक नाईक यांच्या शोधप्रबंधाचा साधर्म्य निर्देशांक (सिमिलॅरिटी इंडेक्स) ८८ टक्के आढळून आला आहे. डॉ. नाईक यांच्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधातील तब्बल ८७ टक्के साहित्य हे इंटरनेट स्रोतांमार्फत ढापण्यात आले आहे. १५ टक्के साहित्य हे विविध प्रकाशनांमधून तर ३४ टक्के साहित्य हे पेपर्समधून जसेच्या तसे उचलून कॉपी पेस्ट करण्यात आले आहे.

डॉ. दीपक नाईक यांच्या शोधप्रबंधातील सर्वाधिक ११ टक्के साहित्यचोरी डॉकसेंटर या इंटरनेट स्रोतांकडून करण्यात आलेली आहे. सेंटर फॉर एज्युकेशन अँड डॉक्यूमेंटेशनच्या वतीने हा इंटरनेट स्रोत चालवला जातो. अजीम प्रमेजी फाऊंडेशनच्या डोनेशनवर हे सेंटर चालवले जाते. त्या खालोखाल १० टक्के ढापाढापी डॉक्झ नेट या इंटरनेट स्रोतातून करण्यात आली आहे.

हेही वाचाः ‘सत्यनिष्ठे’लाच तिलांजली: पीएच.डी.च्या प्रबंधातील वाङ्मयचौर्याच्या ‘कुरापती’ रोखण्याबाबत उदासीनता, यूजीसीच्या नियमांकडेच दुर्लक्ष!

विशेष म्हणजे डॉ. दीपक नाईक यांच्या शोधप्रबंधातील ९ टक्के साहित्य हे सौराष्ट्र विद्यापीठात सादर झालेल्या पीएच.डी.च्या शोधप्रबंधातून उचलून कॉपी पेस्ट करण्यात आले आहे. सौराष्ट्र विद्यापीठाचे शोधप्रबंध इंटरनेटवर ईथिसिस स्वरुपात टाकण्यात आलेले आहेत. डॉ. नाईक यांनी रिसर्च पेपरमधून उचलेगिरी करताना शक्यतो परदेशी रिसर्च पेपर्सचीच निवड केल्याचेही आढळून आले आहे.

असे हे ‘महान’ आणि ‘मूळ स्वरुपातील’ संशोधन कार्य डॉ. दीपक नाईक यांनी पूर्ण केले. त्यांचे मार्गदर्शक डॉ. आय.एल. छानवाल यांनीही ते वाचून आणि पडताळणी करून ‘मूळ स्वरुपातील मौलिक संशोधन’ असल्याचे प्रमाणित केले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे हा शोधप्रबंध सादर करण्यात आला. विद्यापीठाने तो तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठवला आणि त्या तज्ज्ञांनीही त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर व्हायवाअंती डॉ. नाईक यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली.

 म्हणजेच उच्च शिक्षण क्षेत्रातील या साखळीतील प्रत्येक टप्प्यावर वाङ्मयचोरीला डोळे झाकून प्रोत्साहन दिल्या गेले आहे. यापैकी एकाही टप्प्यावर प्रामाणिकपणे पडताळणी झाली असती तर हा प्रकार तेथेच थांबला असता, हे उघड आहे.

बीडच्या बलभीम महाविद्यालयातील वाणिज्य विषयाचे विभागप्रमुख डॉ. आय.एल. छानवाल यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दीपक चंद्रकांत नाईक यांनी पीएच.डी.साठी सादर केलेल्या शोधप्रबंधात ८८ टक्के साधर्म्य निर्देशांक आढळून आला आहे.

काय सांगते विद्यापीठाचे वाङ्मयचोरीविरोधी धोरण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने संशोधनातील वाङ्मयचोरीला पायबंद घालण्यासाठी ‘संशोधनातील गैरव्यवहार आणि वाङ्मयचोरी तपासण्यासाठी आचारसंहिता’ (Code of Ethics to check malpractices and plagiarism in Research) नावाने वाङ्मयचोरीला पायबंद घालण्यासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. ती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अलीकडच्या काळात शास्त्रीय गैरवर्तनाचा एक प्रकार म्हणून वाङ्मयचोरी वाढली आहे, हे प्रारंभीच विद्यापीठाची आचारसंहिता मान्य करते आणि विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि संशोधकांकडून होणाऱ्या वाङ्मयचोरीबाबत ‘झिरो टॉलरन्स’प्रति आपली वचनबद्धता सांगते. या आचारसंहितेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त साधर्म्य आढळून आलेली वाङ्मयचोरी तिसऱ्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आली असून वाङ्मयचोरी आढळलेला विद्यार्थी असेल तर त्याची पीएच.डी.ची नोंदणी थेट रद्द करण्याची तरतूद आहे.

श्रेणी-३ मध्ये वाङ्मयचोरी करणारा प्राध्यापक असेल तर त्याची पदवी रद्द करण्याबरोबरच त्याने त्या पदवीआधारे घेतलेले सर्व लाभ वसूल करून त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. दीपक नाईक यांच्या वाङ्मयचोरीच्या या प्रकरणात आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नेमकी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

न्यूजटाऊनची भूमिका

पीएच.डी. पदवीसाठी होत असलेल्या संशोधनाचा दर्जा आणि गुणवत्ता तपासून पाहण्यासाठी न्यूजटाऊनने ‘टर्निटीन’ या प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणाऱ्या वेबटूलचा आधार घेतला. ‘टर्निटीन’ हे अग्रेसर विशिष्टता तपासणी आणि वाङ्मयचोरी प्रतिबंधक वेबटूल आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या डेटाबेसशी तुलना करून संशोधकाने सादर केलेले काम मूळ स्वरुपाचे आहे की नाही, हे या वेबटूलद्वारे पडताळून पाहता येते.

न्यूजटाऊनने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील काही पीएच.डी.धारक प्राध्यापकांसह नमुना निवड पद्धतीने पीएच.डी.साठी सादर झालेल्या काही प्रबंधांची पडताळणी केली. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएच.डी.साठी होणाऱ्या संशोधनाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढावी तसेच मूळ स्वरुपातील मौलिक संशोधनाला प्रोत्साहन मिळून व्यवहार्य संशोधनाची मानसिकता विकसित व्हावी, हाच न्यूजटाऊनचा या मोहिमेमागचा हेतू आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!