न्यूजटाऊन इम्पॅक्टः सत्यशोधक नेत्या सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी मुलगा इनायत परदेशीविरुद्ध अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल


धुळेः कॉ. शरद पाटील यांच्या सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील महत्वाच्या नेत्या आणि अब्राह्मणी स्त्रीमुक्तीच्या अभ्यासक सरोज कांबळे यांचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मुलगा इनायत रणजित परदेशी हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे निष्पन्न झाले आहे. धुळे पोलिसांनी तब्बल बारा दिवसांनंतर इनायत परदेशीविरूद्ध भादंविच्या कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्यशोधकी, परिवर्तनवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. या प्रकरणाला न्यूजटाऊनने सर्वात आधी वाचा फोडली होती. या प्रकरणी न्यूजटाऊनने घेतलेला पुढाकार आणि सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे दडपून टाकण्याचा जोरकस प्रयत्न झालेले सरोज कांबळे मृत्यू प्रकरण अखेर महाराष्ट्रासमोर आले आहे.

सरोज कांबळे यांच्या मृत्यूच्या घटनेपासूनच मुलगा इनायत परदेशी हाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याची शंका सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीतील कार्यकर्ते दबक्या आवाजात करत होते. परंतु पुढे होऊन स्पष्टपणे बोलायला कुणीही तयार होत नव्हता. तक्रारच नाही, असे सांगत धुळे पोलिसही या प्रकरणाचा तपास करण्यास फारसे उत्सूक दिसत नव्हते. त्यामुळे सरोज कांबळे मृत्यूप्रकरण दडपले जाते की काय, अशी शंकाही बोलून दाखवली जात होती. परंतु अखेर या मृत्यू प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी चळवळीच्या नेत्या सरोज कांबळे यांचा मृत्यू, पोस्टमार्टेम अहवाल गुलदस्त्यात!

सरोज कांबळे यांच्या ज्येष्ठ भगिनी सुधा सुकदेव काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरोज कांबळे यांचा मुलगा इनायत परदेशीविरोधात धुळ्याच्या आझादनगर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३०४ अन्वये सदोष मनुष्यवधाचागुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरोज कांबळे यांचा ५ जून रोजी धुळ्यात संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूबद्दल संशय आल्यामुळे सचिन सोनवणे या कार्यकर्त्याने पोलिसांना कळवले. प्रारंभी पोलिसांनी हे कौटुंबिक प्रकरण असल्यामुळे सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास नकार दिला. परंतु  सचिन सोनवणे व अन्य कार्यकर्त्यांनी रेटा लावल्यामुळे पोलिस घटनास्थळी आले. त्यावेळी सरोज कांबळे यांच्यावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती आणि त्यांचा मृतदेह शववाहिनीवर ठेवण्यातही आला होता.

हेही वाचाः मुलगा ईनायत परदेशीच करायचा सत्यशोधक विचारवंत सरोज कांबळे यांचा अमानुष छळ; धक्कादायक पुरावे न्यूजटाऊनकडे!

तेथे असलेल्या काही कार्यकर्त्यांनी आम्हाला शवविच्छेदन करायचे नाही, तुम्ही निघून जा, असे पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील कार्यकर्ते आणि शवविच्छेदनावर ठाम असलेला कार्यकर्ता यांच्यात बाचाबाचीही झाली होती. नंतर सचिन सोनवणे यांनी पोलिस अधीक्षकांना फोन करून विनंती केल्यानंतर पोलिसांनी सरोज कांबळे यांचा मृतदेह शववाहिनीवरून खाली उतरवून ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदनानंतर ६ जून रोजी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सरोज कांबळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

सरोज कांबळे यांचा मुलगा इनायत परदेशी हा त्यांचा गेल्या चार-पाच वर्षांपासून अमानुष छळ करत होता. त्यांच्यावर हिंस्त्र श्वापदाप्रमाणे पाशवी अत्याचार करत होता. त्याने सरोज कांबळे यांचा जो छळ केला, त्याचा वृत्तांत न्यूजटाऊनने पुराव्यानिशी महाराष्ट्रापुढे मांडला होता. न्यूजटाऊनचा हा वृत्तांत समोर येताच परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते स्तंभित झाले होते.

हेही वाचाः सरोज कांबळे मृत्यूप्रकरणी तपासात हस्तक्षेप करणाऱ्याना आरोपी कराः दिशा पिंकी शेख; सत्य महाराष्ट्राला सांगाः प्राचार्य कांबळे

 सरोज कांबळे मृत्यूप्रकरणात धुळे पोलिसांनी काही जणांचे जबाब नोंदवले. सरोज कांबळे यांच्या बहिणीची मुलगी राजश्री शरद सूर्यवंशी यांना आज धुळे पोलिसांनी जबाबासाठी बोलावले होते. त्यांचा जबाब नोंदवून झाल्यानंतर सुधा काटकर यांनी रितसर फिर्याद दिली. त्यानंतर धुळे पोलिसांनी इनायत परदेशीविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः सत्यशोधक मार्क्सवादी नेत्या सरोज कांबळे मृत्यूप्रकरणः अत्यवस्थ प्रा. रणजित परदेशींना घेऊन इनायत परदेशी फरार, घर कुलुपबंद!

इनायत परदेशी याने आई सरोज कांबळे यांचा अमानुष छळ केला. आपण करत असलेला छळ आणि मारहाणीमुळे सरोज कांबळे यांचा मृत्यू होऊ शकतो, याची पूरेपूर कल्पना असूनही त्याने छळ सुरूच ठेवला आणि त्याच्या या पाशवी छळामुळेच सरोज कांबळे यांचा ५ जून रोजी मृत्यू झाला. सरोज कांबळे यांच्या मृत्यूनंतर इनायत परदेशीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार उरकण्याची घाई केली होती. परंतु काही कार्यकर्त्यांनी त्याला रोखल्यामुळे सरोज कांबळे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!