‘एमपीएससी’च्या गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ च्या जाहिरातीत सुधारणा, सहायक कृषी अधिकारी पदनामात बदल; मुक्त विद्यापीठाच्या ‘या’ चार पदविका समकक्ष


मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या जाहिरातीसंदर्भात आयोगाने शुद्धिपत्रक प्रसिद्ध केले आहे. या शुद्धिपत्रकानुसार कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिनस्त संवर्गातील सहायक कृषी अधिकारी, गट-क या पदनामात बदल करून त्याऐवजी ‘कृषी सेवक, गट-क’ असे पदनाम करण्यात आले आहे.

आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ मधून विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यासाठी २५ जून २०२६ रोजी जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीसंदर्भात ६, १३, १७ आणि २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शुद्धीपत्रकांच्या अनुषंगाने सदर सुधारणा करण्यात आली आहे.

नागपूर विभागांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात अनुसूचित जमाती प्रवर्गातून भरावयाच्या एकूण पदांचे आरक्षण व त्याचा प्रवर्गनिहाय तपशील शुद्धिपत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.

याशिवाय, कृषी पदविका धारण केलेल्या उमेदवारांसाठी शैक्षणिक अर्हतेसंदर्भात महत्वाची स्पष्टता करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील कृषी पदविका राज्यातील कृषी विद्यापीठांच्या पदविकेशी समतुल्य असलेल्या पुढील चार अभ्यासक्रमांच्या पदविकांना ग्राह्य समजण्यात येणार आहे.

  • उद्यानविद्या पदविका (फळबागा उत्पादन).
  • उद्यानविद्या पदविका (भाजीपाला उत्पादन).
  • उद्यानविद्या पदविका (फूल शेती व प्रांगण उद्यान).
  • कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदविका.

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२६ च्या मूळ जाहिरातीतील तसेच यापूर्वीच्या शुद्धीपत्रकातील इतर अटी व तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या शुद्धीपत्रकाची सविस्तर माहिती आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!