सरपंच मंगेश साबळेंना संभाजीनगर, जालना जिल्ह्यातून २ वर्षे तडीपारीची नोटीस, ५ दिवसात बाजू न मांडल्यास होणार कारवाई


छत्रपती संभाजीनगर: लक्षवेधी आंदोलने करून कायम चर्चेत राहणारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच मंगेश साबळे यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची नोटीस बजावली आहे. साबळे यांनी पाच दिवसात चौकशीसाठी हजर राहून बाजू न मांडल्यास त्यांना या दोन जिल्ह्यातून तडीपार केले जाणार हे जवळपास निश्चित आहे.

सरपंच मंगेश साबळे यांच्यावर गुंडगिरी, दहशत निर्माण करणे, खंडणी उकळणे, शासकीय कामात अडथळा आणून कामकाज ठप्प करणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. साबळे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. छत्रपती संभाजीनगर शहर विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सागर देशमुख यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५६ (१) (अ) (ब) नुसार मंगेश साबळे यांना ८ ऑगस्ट रोजी ही नोटीस बजावण्यात आली असून साबळे यांना पाच दिवसात चौकशीसाठी हजर राहून बाजू मांडण्यास सांगण्यात आले आहे. निर्धारित वेळेत हजर न राहिल्यास त्यांच्या गैरहजेरीत चौकशी सुरू ठेवून एकतर्फी अहवाल दिला जाईल, असेही नोटिशीत म्हटले आहे.

मंगेश साबळे यांच्या कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता, नागरिकांचे जीवन, मालमत्ता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याविरूद्ध छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्हा आणि जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई का करण्यात येऊ नये? असे या नोटिशीत म्हटले आहे.

विविध पोलिस ठाण्यात ८ गंभीर गुन्हे

मंगेश साबळे यांच्याविरूद्ध सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर आणि फुलंब्री पोलिस ठाण्यात २०२० ते २०१६ या काळात ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात सिटी चौक पोलिस ठाण्यात २०२६ मधील दोन गुन्हे, जवाहर नगर पोलिस ठाण्यातील २०२० मधील गुन्हा आणि फुलंब्री पोलिस ठाण्यातील २०२१, २०२३ आणि २०२४ मधील गुन्ह्यांचा समावेश आहे.

शासकीय कामात अडथळे आणि दहशत

सरकारी कार्यालयात बेकायदा जमाव जमवून गोंधळ घालणे, प्रशासकीय कामकाज ठप्प करणे, अधिकाऱ्यांना ओलिस ठेवणे आणि आत्मदहनाचा इशारा देऊन दहशत निर्माण करणे असे आरोप साबळे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. रोहयोअंतर्गत विहीर मंजुरीच्या प्रकरणात पंचायत समिती कार्यालयात घुसून गोंधळ घालणे आणि नोटांचे बंडल्स दाखवून पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेखही या नोटिशीत आहे.

अधिकारी-व्यापाऱ्यांकडून खंडणी वसुली

सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणे, अधिकारी व कर्मचाऱ्यांना नोकरीवरून घालवण्याच्या धमक्या देणे, अधिकारी-व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी उकळणे, दादागिरी करणे अशा अनेक तक्रारी गोपनीय साक्षीदाराच्या जबाबातून पुढे आल्याचेही या नोटिशीत म्हटले आहे.

बंधपत्राचे उल्लंघन करून धिंगाणा

मंगेश साबळे यांच्याविरूद्धची काही प्रकरणे तपासाधीन असून काही प्रकरणात न्यायालयात दोषारोरपत्र दाखल करण्यात आले आहे. १५ जुलै २०१६ रोजी मंगेश साबळे यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२९ अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून बंधपत्र घेण्यात आले होते. पूर्वीच्या कारवायांनंतर चांगली वर्तणूक करण्याचे बंधपत्र देऊनही त्याचे उल्लंघन करून साबळे यांच्या वर्तणुकीत कोणतीही सुधारणा झाली नसल्यामुळे तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.

कोण आहेत मंगेश साबळे?

फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावचे सरपंच असलेले मंगेश साबळे हे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळी भररस्त्यात आपली कार पेटवून दिल्यामुळे चर्चेत आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते जालना मतदारसंघातून मैदानात उतरले होते. या निवडणुकीत लाखाच्या आसपास मते मिळवल्यामुळेही ते चर्चेत आले होते. विविध प्रश्नांवर लक्षवेधी आंदोलने करून चर्चेत राहणे ही मंगेश साबळे यांची खासियत आहे.

राजकीय सुडबुद्धीने कारवाई: साबळे

दरम्यान, साबळे यांनी तडीपारीच्या नोटिशीवर आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्याविरूद्धची ही कारवाई राजकीय सुडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ओएसडींना आमदार व्हायचे आहे, म्हणून मला जिल्ह्यातून बाहेर काढण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. गोरगरिब जनता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळे व्यवस्थेचे फटके बसणार असतील तर मी तडीपार व्हायला तयार आहे. एका मंगेश साबळेला जिल्ह्यातून बाहेर काढले तरी मी संपूर्ण महाराष्ट्र फिरून हजारो मंगेश साबळे उभे करेन.संपूर्ण राज्यात भीक मागो आंदोलनही करीन, असा इशारा साबळे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!