
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद): राज्य सरकारच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत राज्यातील अकृषी विद्यापीठांचे गुणांकन नुकतेच जाहीर करण्यात आले असून या गुणांकनात राज्यातील १३ अकृषि विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ११ व्या स्थानी फेकले गेले आहे. या गुणांकनात मुंबई विद्यापीठ अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे या गुणांकनात काही वर्षांपूर्वीच स्थापन झालेल्या तुलनेने नवख्या विद्यापीठांनी लक्षणीय कामगिरी करत चांगले गुणांकन प्राप्त केले आहे.
दैनंदिन कामकाजामध्ये सेवाविषयक बाबी, प्रशासकीय कार्यक्षमता, पारदर्शकता आणणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि प्रलंबित प्रकरणे वेळेत मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५० दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवला होता. पुढे या कार्यक्रमाला १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
या सेवाकर्मी कार्यक्रमाबाबतचा अहवाल आणि गुणांकन राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अधीनस्त असलेल्या राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांच्या गुणांकनाचाही त्यात समावेश आहे. पदोन्नती, सेवा ज्येष्ठता सूची, अनुकंपा भरती, कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावत करणे, पदभरतीची प्रक्रिया गतीमान करणे या उद्देशाने सेवा प्रवेश नियम, बिंदूनामावली प्रमाणीकरण, आकृतीबंध, iGOT प्रशिक्षण आणि प्रशासकीय कामकाजातील सुधारणा यासारख्या ९ प्रमुख घटकांवर आधारित हे मूल्यांकन करण्यात आले.
या मूल्यांकनात ८० गुणांसह मुंबई विदयापीठाने प्रथम स्थान पटकावले आहे. ७७ गुणांसह एसएनडीटी विद्यापीठ दुसऱ्या स्थानी राहिले आहे. विशेष म्हणजे ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ मध्ये स्थापन झालेल्या गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने या गुणांकनात ६९ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. या गुणांकनात छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ५९ गुणांसह ११ व्या स्थानी फेकले गेले आहे. विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची यंदाच्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये लक्षणीय घसरण झाली. त्या घसरणीतून विद्यापीठ प्रशासनाने कोणताच धडा घेतला नसल्याचे या गुणांकनातून स्पष्ट झाले आहे. या गुणांकनात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ५२ गुणांसह शेवटच्या स्थानी फेकले गेले आहे.
अकृषि विद्यापीठांचे ‘सेवाकर्मी’ स्थान व गुण
- मुंबई विद्यापीठ, मुंबई- ८०
- एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई-७७
- गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली-६९
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक-६८
- शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर-६७
- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव-६७
- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड-६५
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती-६३
- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर-६३
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-५९
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर-५९
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठ, अमरावती-५९
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे-५२
