सरकारी शाळेत विद्यार्थ्यांच्याच पैश्यातून बांधले ‘भूत मंदिर’, वाद चिघळताच शिक्षण विभागाने दिले चौकशीचे आदेश


नवी दिल्लीः उत्तराखंड राज्यातील कुमाऊंच्या पर्वत रांगात वसलेल्या कौसानीमधील एका सरकारी शाळेच्या परिसरातच छोटेखानी ‘भूताचे मंदिर’ बांधण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. शाळेच्या परिसरातच ‘भूताचे मंदिर’ मंदिर बांधल्याचा वाद चिघळू लागताच आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मागील ३० वर्षांपासून शाळेच्या परिसरात भटकत असलेल्या एका आत्म्याला शांत करण्यासाठी हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून वर्गणी गोळा करण्यात आली होती.

शाळेच्या परिसरात भटकत असलेल्या ‘आत्म्याला दूर ठेवण्यासाठी’ आधी विटांची तात्पुरती संरचना बांधण्यात आली. परंतु जेव्हा शाळेतील अनेक विद्यार्थीनी अज्ञात कारणांमुळे बेशुद्ध पडू लागल्या, तेव्हा ‘नेपाळच्या एका कामगाराची भटकती आत्मा’ त्याला कारणीभूत असल्याचा समज करून घेण्यात आला, असे सांगण्यात येते.

तीन दशकांपूर्वी या सरकारी शाळेजवळच झालेल्या एका अपघातात त्या नेपाळी कामगाराचा मृत्यू झाला होता. त्या कामगाराच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून नंतर एक पक्क्या स्वरुपाचे छोटेसे मंदिर बांधण्यात आले, असे येथील लोक सांगतात.

याबाबत या शाळेतीलच एका शिक्षिकेने नाव न छापण्याच्या अटीवर टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, मंदिर बांधण्यापूर्वी आपण शाळेच्या परिसरात बेशुद्ध पडणाऱ्या मुलींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. डोंगरी भागात देवी-देवता आणि आत्म्यांवरील श्रद्धा खूपच प्रबळ आहे. विद्यार्थ्यांमधील भीती कमी करण्याचा उपाय म्हणून या ‘भूताच्या मंदिरा’कडे पाहिले गेले, असेही त्या म्हणाल्या.

या भूताच्या मंदिराच्या बांधकामासाठी यंदा जानेवारी महिन्यात शाळेच्या शिक्षक-पालक संघाने पुढाकार घेतला होता. इयत्ता ६ ते १२ पर्यंतच्या २१८ विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १०० रुपये गोळा करण्यात आले. त्यातून एकूण २१ हजार ८०० रुपये जमा झाले. दुसरीकडे हे मंदिर बांधण्यासाठी २५ हजार रुपये खर्च झाला. या मंदिर बांधकामात पालक आणि शिक्षकांचेही योगदान आहे, असे सूत्रांचा हवाला देऊन या वृत्तात म्हटले आहे.

विदयार्थी वारंवार आजार पडू लागल्यामुळे आपण या भूताचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, असे शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष चंदनसिंह भंडारी यांनी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक ताजबरसिंह नेगी यांनी सांगितले की, शिक्षक-पालक संघाच्या बैठकीत सर्वसम्मतीने वर्गणी गोळा करण्यात आली होती. त्याचा उद्देश छोटेश्या मंदिराचे बांधकाम आणि त्याची सफाई असा होता. शाळेच्या परिसरात ‘अभ्यासासाठी शांततापूर्ण वातावरण निर्माण करणे’ हा हे मंदिर बांधण्यामागचा मूळ हेतू होता, असेही शाळेचे मुख्याध्यापक नेगी म्हणाले.

विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून गोळा केलेली वर्गणी आणि तिचा झालेला वापर यावर काही जणांनी आक्षेप घेतल्यामुळे वादाला तोंड फुटले. त्यानंतर ही बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली. मग गुरूवारी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, जिल्हा शिक्षण अधिकारी विनय कुमार यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!