Video: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या आई कमलाताई आरएसएसच्या व्यासपीठावर जाणारच, पुत्र राजेंद्र गवई यांचा मोठा खुलासा; सोशल मीडियावरील ‘ते’ पत्र खोटे!


नागपूरः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त अमरावती येथे ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विजयादशमी सोहळ्यासाठी देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. आरएसएसने त्यांनी य कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वतःच स्वीकारले, असा मोठा खुलासा त्यांचे आणखी एक पुत्र व रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी केला आहे. त्यामुळे कालपासून कमलाताईंच्या नावाने समाजमाध्यमावर व्हायरल होत असलेले पत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले असून गवई परिवाराच्या ‘निष्ठा’ही उजागर झाल्या आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत आहेत. आरएसएसच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त ५ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे आयोजित विजयादशी पथसंचलनाच्या कार्यक्रमात देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. तशा निमंत्रणपत्रिकाही आरएसएसच्या अमरावती महानगर शाखेच्या वतीने सर्वत्र वाटप करण्यात आल्या आहेत. आरएसएसच्या विजयादशमी सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून कमलाताई गवईंचे नाव पाहूण महाराष्ट्रभरातून टिकेची झोड उठली होती. या टिकेनंतर कमलाताई गवई यांच्या नावाने स्वाक्षरी नसलेले एक पत्र रविवार सकाळपासूनच सोशल मीडियावर व्हायरल झाले.

हेही वाचाः आरएसएसच्या शताब्दी विजयादशमी सोहळ्याला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई मुख्य अतिथी!

‘अमरावतीत होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याला आपण उपस्थित राहणार नसून याबाबत प्रसारमाध्यांमध्ये प्रकाशित झालेली बातमी खोटी आहे. मला विश्वासात घेतले गेले नाही किंवा लेखी होकार घेतला गेला नाही. आरएसएसचे हे षडयंत्र आहे. मी निमंत्रण स्वीकारलेले नाही. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टची संस्थापक अध्यक्ष म्हणून आंबेडकरी विचाराने ओतप्रोत आणि देशाच्या संविधानाप्रती माझे घराणे अविरत प्रामाणिक असल्यामुळे आरएसएसच्या अमरावतीत होणाऱ्या कार्यक्रमाला कदापिही हजर होणार नाही. आपण पक्के आंबेडकरवादी आहोत. सामाजिक जाणिवेला कुठल्याही प्रकारचे दुःख होऊ देणार नाही’ असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.

कमलाताई गवई यांची स्वाक्षरी नसलेले हे हस्तलिखित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ‘देर आए, दुरूस्त आए’ म्हणत अनेकांनी कमलाताई गवईंच्या या भूमिकेचे स्वागतही केले. परंतु या आनंदाच्या उकळ्यांवर कमलाताई गवई यांचे आणखी एक पुत्र व रिपब्लिकन पक्षाचे नेते राजेंद्र गवई यांनी एक व्हिडीओ जारी करून विरजन घातले आणि कमलाताई गवई आरएसएसच्या कार्यक्रमाला नक्की हजर राहणार त्यांनी स्वतःच या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, असे ठामपणे स्पष्ट केले. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेले ते पत्र खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेमके काय म्हणाले राजेंद्र गवई?

राष्ट्रीय स्वयंसेवक संगाच्या विजयादशमी सोहळ्याचे निमंत्रण कमलाताई गवई यांना मिळालेले आहे. त्यांनी ते स्वीकारलेले आहे आणि त्या या कार्यक्रमाला नक्की जाणार आहेत. यापूर्वीही या कार्यक्रमाला दिवंगत नेते राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गवई हे सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. गवई परिवाराचे यापूर्वी पक्षविरहित संबंध राहिलेले आहेत. प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे संबंध होते, असे राजेंद्र गवई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे.

दिवंगत माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्याशीही त्यांचे नजीकचे संबंध होते. त्यामुळेच आईसाहेबांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. गंगाधर फडणवीस यांच्याशी त्यांचे भावासारखे संबंध होते. वैचारिक मतभेद वेगळे होते. मात्र एकमेकांच्या कार्यक्रमाला गेले पाहिजे. कार्यक्रमाला गेल्याने आपण विचारधारा स्वीकारतो, असे नाही. आम्ही विचारधारेचे पक्के आहोत. भूषण गवई हे सरन्यायाधीश झाल्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे लोक चुकीच्या टीका करत आहेत. अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे उत्तम राहील, असेही राजेंद्र गवई यांनी या व्हिडीओत म्हटले आहे. पहा व्हिडीओः

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!