
परभणीः आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सूर्यंवंशींच्या न्यायालयीन कोठडतील मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवूनही परभणी पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांविरुद्ध नव्हे तर एका अनोळखी व्यक्तीविरुद्धच खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परभणी पोलिसांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून परभणी पोलिस सोमनाथ सूर्यवंशींच्या मारेकऱ्यांना अजूनही वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत? असा सवाल केला जात आहे.
परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची १० डिसेंबर २०२४ रोजी विटंबना झाली होती. त्याची प्रतिक्रिया म्हणून ११ डिसेंबर रोजी परभणीत प्रचंड जनक्षोभ उफाळून आला होता. यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळ प्रकरणी परभणी पोलिसांनी कायद्याचे शिक्षण घेत असलेला आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली होती. त्याला परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर १५ डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
सुरूवातीला पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेल्या इन कॅमेरा पोस्टमार्टेममध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मल्टिपल इंज्युरीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले होते.
नवा मोंढा पोलिसांच्या कोठडीत पोलिसांनीच बेदम मारहाण केल्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी दोषी पोलिसांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयाबाईच्या वतीने युक्तीवाद केला होता.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशींच्या कोठडीतील मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एक आठवड्याच्या आत सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश ४ जुलै २०२५ रोजी दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या आदेशाविरुद्ध महायुतीच्या फडणवीस सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयातही ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयाबाई सूर्यवंशी यांची बाजू जोरकसपणे मांडल्यानंतर ३० जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून लावत औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम ठेवला होता.
‘अनोळखी व्यक्ती’च कश्यासाठी?
सर्वोच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाचा आदेश कायम ठेवल्यामुळे परभणी पोलिसांची पाचावर धारण बसली. आता गुन्हा दाखल केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे लक्षात आल्यानंतर विजयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश असताना आणि ते आदेश सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवलेले असताना परभणीच्या नवा मोंढा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा का दाखल केला? परभणी पोलिस कोणत्या पोलिस अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी ही सगळी धडपड करत आहेत? असे प्रश्न आता विचारला जात आहेत.
‘त्या’ पोलिसांची ओखळ का पटवली नाही?
परभणीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून परभणीतील आंबेडकरी समुदायातील शेकडो लोकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले होते. तसेच फुटेज पुरावे नवा मोंढा पोलिसांकडे असतानाही हा गुन्हा दाखल करताना त्या फुटेजची मदत मात्र घेण्यात आली नाही. त्यामुळे काही गंभीर प्रश्न उपस्थित होतात ते असेः
- नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या परिसरातही सीसीटीव्ही यंत्रणा आहे. त्यामुळे ज्या काळात सोमनाथ सूर्यवंशी नवा मोंढा पोलिसांच्या कोठडीत कोणता पोलिस अधिकारी गेला आणि कोणत्या पोलिस अधिकाऱ्याने सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली? याबाबतच्या सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा नवा मोंढा पोलिसांकडे नसेल का?
- परभणीच्या नवा मोंढा पोलिसांकडे हे सीसीटीव्ही फुटेज असेल तर पोलिस कोठडीत शिरून सोमनाथ सूर्यवंशीला बेदम मारहाण करणारा तो पोलिस अधिकारी कोण त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांनी का केला नाही?
- अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलिस कोठडीत असलेल्या लोकांमध्येच वादावादी झाली आणि त्यात मार लागल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असे भासवण्याचा प्रयत्न तर या सगळ्या खटाटोपामागे नाही ना?
- अनोळखी व्यक्तीविरुद्ध दाखल केलेल्या या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे यांच्याकडे देण्यात आला आहे. किमान सीआयडी तरी ही ‘अनोळखी व्यक्ती’ सापडेल का? आणि सीआयडीलाही ती अनोळखी व्यक्ती सापडली नाही तर या प्रकरणाचे पुढे नेमके काय होणार? हे गंभीर प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
विजयाबाईच्या फिर्यादीत पीआय घोरबांडचे नाव
सोमनाथ सूर्यवंशीची आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी नवा मोंढा पोलिसात जी फिर्याद दिली त्यात घोरबांड यांच्या नावाचा स्पष्टपणे उल्लेख आहे. विजयाबाई त्यांच्या कुटुंबीयांसह औरंगाबादला घाटी रुग्णालयाकडे निघालेल्या असताना त्यांना पोलिसांनी रस्त्यात अडवून परभणी येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात नेले. तेथे घोरबांड नावाच्या पोलिस अधिकाऱ्याने ‘आम्ही तुमच्या मुलाला मारले नाही तो अटॅकने वारला. आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमच्या एका मुलास पोलिस प्रशिक्षण देतो, तुम्ही तुमच्या मुलाचे प्रेत गावी घेऊन जा, असे सांगितले’, असे फिर्यादीत स्पष्टपणे नमूद केले आहे.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा अशोक घोरबांड हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत पोलिस निरीक्षकपदावर कार्यरत होते. त्यांनी परभणीतील आंदोलनादरम्यान त्यांनीच अतिरिक्त पोलिस बळाचा वापर करून वातावरण पेटवल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलेले आहे.
या प्रकरणातील घोरबांड यांची एकूणच भूमिका आणि सोमनाथच्या मृत्यूनंतर त्यांनी विजयाबाईंचे मन वळवण्याचा केलेला प्रयत्न पाहता तेच या प्रकरणाचे खरे मास्टर माइंड आहेत अशी शंका सुरूवातीपासूनच घेतली जात असताना आणि विजयाबाईच्या फिर्यादीत त्यांचे स्पष्ट नाव असताना त्यांचे नाव आरोपी म्हणून का नोंदले गेले नाही? असाही सवाल केला जात आहे.
तब्बल ७२ पोलिस कर्मचाऱ्यांवर ठपका
सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणाची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात आलेली आहे. प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूप्रकरणात तब्बल ७२ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे. तरीही परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात एकाच अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा का दाखल केला गेला? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
एफआयआर झाल्यावर काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला कायम ठेवत शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल झाला आहे. या संदर्भात चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर चौकशीला सुरूवात होईल.
–ऍड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे नेते

