
बीडः अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्याच्या कटात सहभागी होण्याची खळबळजनक ऑफर बीड जिल्ह्यातील एका तरूणाला थेट पाकिस्तानातून देण्यात आली आहे. राम मंदिर उडवून देण्यासाठी या तरूणाला एक लाखाची ऑफर देण्यात आली आहे. मंदिर उडवून देण्यासाठी आपण आरडीएक्स पुरवू असेही या ऑफरमध्ये म्हटले आहे. या कटात सहभागी होण्यासाठी आणखी ५० लोकांची आवश्यकता असल्याचेही या मेसेजद्वारे त्या तरुणाला पाठवलेल्या मेजेसमध्ये नमूद करण्यात आले असल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलिस ठाण्यात त्या तरूणाने तक्रार दिली आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर उडवून देण्यासाठी ऑफर देण्यात आली आहे. त्यासाठी आपणाला एक लाख रुपयाची ऑफर देण्यात आली आहे. या कामासाठी ५० जण हवे असून त्यांना प्रत्येकी एक-एक लाख रुपये देऊ तर मंदिर उडवण्यासाठी आरडीएक्स पुरवू असे संशयिताने मेसेजद्वारे म्हटले आहे. आपण पाकिस्तानी आहोत हे पटवून देण्यासाटी या मेसेजमध्ये पाकिस्तानातील कराचीतील लोकेशनही पाठवण्यात आले आहे, असे या तरूणाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
थेट पाकिस्तानातून मेसेज प्राप्त झालेल्या त्या तरूणाने शिरूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून पाकिस्तानातील संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. हा नेमका काय प्रकार आहे? हे तपासाअंतीच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. आता पोलिसांच्या तपासात नेमकी काय माहिती समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेमके काय म्हटले मेसेजमध्ये?
बीड जिल्ह्यातील या तरूणाला ऑडिओ क्लिपद्वारे हिंदीतून हा मेसेज पाठवण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘बताओ, हमारा साथ दो, अपना मुंह खोलो, तुम्हे रक्कम चाहिए I अयोध्या के मंदिर को आरडीएक्स से उडाना है I इस काम के लिए हमें पचास आदमी चाहिए| आरडीएक्स पहुंच जाएगा I जो काम करेगा उसे एक-एक लाख मिलेंगे| अगर नही कर पाएं तो कोई नंबर दे सकते हो|’ असा हा ऑडिओ मेसेज आहे. बीडच्या या तरूणाला खात्री पटावी म्हणून या संशयिताने पाकिस्तानमधील कराचीचे एका ठिकाणचे लोकेशनही पाठवले आहे. आता पोलिसांनी पाकिस्तानातील त्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी सुरू केली आहे.
