
नवी दिल्लीः परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयातही फसला. सोमनाथच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेले आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (३० जुलै) कायम ठेवले असून याबाबत महाराष्ट्र सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश मिळाले आहे.
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आंबेडकरी समुदायात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि त्याचे रुपांतर जनआंदोलनात झाले होते. ११ डिसेंबर रोजी या आंदोलनाने उग्र रुप धारण केले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून आंबेडकरी समुदायातील अनेक महिला व पुरूषांना अटक केली होती. त्यात कायद्याचे शिक्षण घेणारा आंबेडकरी कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशीचाही समावेश होता.
अटकेनंतर न्यायालयाने सोमनाथ सूर्यवंशीला पोलिस कोठडी सुनावली. नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाच १५ डिसेंबर २०२४ रोजी सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला होता. सोमनाथला पोलिसांनी कोठडीत बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप सोमनाथच्या कुटुंबीयांकडून आधीपासूनच करण्यात येत होता.
सोमनाथचा मृत्यू परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यातील कोठडीतच पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच झाल्याने त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजया सूर्यवंशी यांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती.
सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एक आठवड्याच्या आत सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने ४ जुलै रोजी दिले होते. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अपील दाखल केले होते. हे अपील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले असून दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश कायम ठेवले असल्याची माहिती ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात ऍड. प्रकाश आंबेडकर आणि अन्य दोन वकिलांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या आई विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांची बाजू मांडली.
आता एफआयआर बंधनकारकच
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवला आहे. राज्य सरकाराचे अपील फेटाळून लावले आहे. हात झटकण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करणे बंधनकारक आहे, असे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पोलिस व प्रशासनाकडून कोर्टाचा अवमान
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येप्रकरणी एका आठवड्याच्या आत जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र आजपर्यंतही तो एफआयआर दाखल झालेला नाही. त्यामुळे आता पोलिस आणि प्रशानावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होते का? हे पाहणे महत्वाचे आहे. आजच्या सुनावणीदरम्यान ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनासही आणून देण्यात आली. त्यावर अद्याप एफआयआर का दाखल झाला नाही?, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली, असेही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जेजे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आरोपी करणार
सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणात राज्य सरकारच आरोपी आहे. सोमनाथचा मृत्यू राज्याच्या ताब्यात असताना झाला. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू मल्टिपल इंज्युरीमुळेच झाल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालेले असतानाही राज्य सरकारने जे.जे. रूग्णालयाच्या डॉक्टरांकडून सेकंड ओपिनियनसाठी दुसरा पोस्टमार्टेम रिपोर्ट मागवला. सेकंड ओपिनियनसाठी न्यायालयाची पूर्वपरवानगी लागते. जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पूर्वपरवानगी न घेताच दुसरा पोस्टमार्टेम रिपोर्ट दिला. त्यामुळे जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनाही आरोपी करावे, असा अर्ज आम्ही आता न्यायालयात करणार आहोत, असे ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी पोलिसांवर गुन्हे?
न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर पुढे काय कारवाई करावी, याबाबत कायद्यात तरतूदच नाही. त्यामुळे आता उच्च न्यायालय याबाबत गाईडलाईन्स ठरवणार आहे. त्यानंतर एसआयटी स्थापनेबाबत किंवा तपास अधिकाऱ्यांबाबत निर्णय घेतला जाईल. परभणीतील कोम्बिंग ऑपरेशनचीही न्यायालयाने नोंद घेतली आहे. हे कोम्बिंग ऑपरेशनही आता चौकशीचा भाग होईल. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी पोलिस अधिकाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल होऊ शकतात, असेही ऍड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.
फडणवीस भर विधानसभेत म्हणाले होते…
सोमनाथ सूर्यवंशी हत्येप्रकरणी नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या अहवालाचा दाखला देत सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ ऍक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचा दावा केला होता. आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती दिली होती. या प्रकरणी न्यायालयीन समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल, असेही फडणवीस म्हणाले होते.

