
मुंबईः बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तामिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागात गारपीटीची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १ एप्रिलपासून पुढील चार ते पाच दिवस मुंबई-पुण्यासह विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
मंगळवार आणि बुदवारी राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर रहाण्याची शक्यता आहे. हे दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या बहुतांश भागात ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे.
बाष्पयुक्त वातावरण आणि तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत. जास्त उंचीच्या ढगांमुळे विजांचा गडगडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात सध्या कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
मराठवाड्यात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागांत पुढील २४ तासांत गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता आहे.
१ एप्रिलः जळगाव, नाशिक, नाशिकचा घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, कोल्हापूर घाट, कोल्हापूर जिल्हा, सातारा घाट, सातारा जिल्हा, सांगली, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
२ एप्रिलः पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊन अवकाळी पावसाह गारपीटीची शक्यता आहे.
ठाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सांगली, बीड, अकोला,अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
३ आणि ४ एप्रिल रोजीही राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण रहाण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर ३ एप्रिल रोजी गोंदिया जिल्ह्यात सोसाट्याचे वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता आहे.
