मुंबईः महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा केव्हाही जाहीर होऊ शकतात, ही शक्यता लक्षात घेऊन सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामाला सामोरे जाण्यासाठी कंबर कसली असतानाच राज्यात महाविकास आघाडीचीच चलती असल्याचा गोपनीय अहवाल महाराष्ट्र पोलिसांनी दिल्यानंतर मंत्रालयातील नूरच बदलला आहे. या अहवालानंतर अनेक ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मविआच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.
महाराष्ट्रात निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत. त्यांचे जागावाटप लवकरच जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
भाजपच्या नेतृत्वातील सत्ताधारी महायुतीही निवडणुकीच्या कामाला लागली आहे. महायुतीतही जागावाटपाबाबत चर्चा सुरू आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीने मंत्रालयातील फायलींचा निपटारा करण्याचा धडाका लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीने गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या नाराज नेत्यांच्या महामंडळावर नियुक्त्या करून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील काही देवस्थान ट्रस्टवरील नियुक्त्या जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली असतानाच महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या गोपनीय अहवालात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येण्याचा अंदाज वर्तवला आहे. हा अहवाल आल्यानंतर राज्यातील अनेक ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांनी मविआच्या नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे, असा दावा ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तात केला आहे.
पोलिसांच्या गोपनीय अहवालात आगामी विधानसभा निवडणुकीत मविआचीच आघाडी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर राज्यातील बहुतांश ज्येष्ठ आयएएस अधिकारी विरोधी पक्षातील नेत्यांच्या संपर्कात राहू लागले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर द्विधा मनःस्थितीत असलेले आयएएस अधिकारी मविआ पुन्हा सत्तेत आल्यास मविआच्या नेत्यांसोबत काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे संकेत देऊ लागले आहेत, असे या वृत्तात म्हटले आहे.
मंत्र्यांच्या आदेशांकडे कानाडोळा
पोलिसांच्या गोपनीय अहवालानंतर ज्येष्ठ आयएएस अधिकारी सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गुडबुकमध्ये राहण्याची धडपड करत आहेत. त्यामुळे हे अधिकारी मंत्र्यांच्या आदेशांचे १०० टक्के पालनही करेनासे झाले झाले आहेत. ऐननिवडणुकीच्या तोंडावर मंत्र्यांच्या आदेशांचे शंभर टक्के पालन केल्यास आपल्याविषयी मविआमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. या अधिकाऱ्यांना सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआ या दोघांच्याही गुडबुकमध्ये रहायचे आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.
शरद पवारही म्हणतात…
आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) एकत्र लढवणार आहेत. राज्यात महाविकास आघाडीला वातावरण अनुकूल आहे. महाराष्ट्रातील लोक सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या लोकांना बाजूला सारण्यास उत्सूक आहेत, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही केला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून तिन्ही पक्षाचे नेते बसत आहेत आणि जागावाटपाच्या प्रक्रियेबाबत चर्चा करत आहेत. या बैठकीची प्रक्रिया लवकरच संपण्याची शक्यता आहे. जेव्हा याबाबत निर्णय होईल, तेव्हा तो तो पक्ष त्यांच्या वाट्याला आलेल्या जागेनुसार त्या जागी कोण उमेदवार द्यायचा, याचा विचार करेल. पुढील दहा दिवसांत हे सगळे संपवून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाणे आणि लोकांना आपली भूमिका सांगणे हे काम आमचे सहकारी सुरू करतील, अशी आमची अपेक्षा आहे, असे शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.