
पुणेः बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यात अटक केली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. या हत्याकांडातील फरार आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले होते. पोलिसांनी ग्रामस्थांना १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन दिले होते.
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातील मास्टरमाईंड वाल्मिक कराडने काही दिवसांपूर्वीच पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरणागती पत्करली होती. आता या हत्याकांडातील फरार तीनपैकी दोन आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यात अटक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
संतोष देशमुख हत्याकांडानंतर सुदर्शन चंद्रभान घुले (वय २६, रा. टाकळी ता. केज), सुधीर ज्ञानोबा सांगळे (वय२३, रा. टाकळी, ता. केज) आणि कृष्णा आंधळे हे तीन आरोपी फरार झाले होते. पोलिसांची विशेष पथके त्यांचा शोध घेत होती. गुप्त माहितीच्या आधारे विशेष पोलिस पथकाने पुण्यात छापेमारी करून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक केली आहे.
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या आरोपींना मदत करणाऱ्या डॉ. संभाजी वायभसे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. वायभसे याने आरोपींना पळून जाण्यास मदत केली होती
सुदर्शन घुले, सुधीर सांगळेच्या अटकेमुळे संतोष देशमुख हत्याकांडाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. त्यांच्या अटकेमुळे या हत्याकांडातील आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या हत्याकांडात आणखी काही जण सामील असण्याची शक्यता असून त्यांचीही नावे लवकरच समोर येतील, अशी शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
आ. धस म्हणालेः सुदर्शन घुले काही मुख्य आरोपी नाही
दरम्यान, या दोन आरोपींच्या अटकेवर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन मुख्य आरोपींना अटक झाली आहे, असे विचारले असता आ. धस म्हणाले की, अजून एक राहिलाय ना…कृष्णा आंधळे आणि सुदर्शन घुले हा काही मुख्य आरोपी नाही, प्यादं आहे. मुख्य आरोपी पोलिसांनी शोधला पाहिजे. मुख्य आरोपी आका आहे. ज्याचा उल्लेख मी आका असा करतो, तो संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. घुले-सांगळेला फक्त सांगितले, जाओ ऐसा ऐसा करो… सुदर्शन घुले फक्त अंमलबजावणी करणारा आहे, असे आ. धस म्हणाले.
