बारामतीः बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युगेंद्र पवार यांच्या हायहोल्टेज लढत होत आहे. काका-पुतण्यात होत असलेल्या या लढतीकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले असतानाच बारामतीत युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयटो मोटर्सची सोमवारी रात्री पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यामुळे बारामतीतील वातावरण चांगलेच तापले आहे.
सोमवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीत रंगलेला हायव्होल्टेज प्रचारही थांबला. त्यातच सोमवारी रात्री अचानक निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयटोची झाडाझडती घेतली.
सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने युगेंद्र पवार आणि त्यांचे कुटुंबीय दिवसभर प्रचारात व्यस्त होते. सोमवारी सायंकाळी ५ वाजता प्रचाराची वेळ संपली आणि रात्री निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या शरयू टोयटोमध्ये झाडाझडती घेत सर्च ऑपरेशन राबवले. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.
शरयू टोयटोमध्ये सर्च ऑपरेशन राबवणाऱ्या पोलिसांनी श्रीनिवास पवार यांच्या केबिनचीही तपासणी केली. मतदानाच्या तोंडावरच श्रीनिवास पवार यांच्या मालकीच्या या आस्थापनेमध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवल्याने बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
’१० ते १२ पोलिसांची एक टीम सोमवारी रात्री शरयू टोयटो येथे आली होती. पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. पोलिसांना काहीही सापडेल नाही. आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. पोलिसांचे हे रूटीन ऑपरेशन वाटत नाही. आमच्या सभेनंतर लगेच हे सर्च ऑपरेशन झाले आहे. यापूर्वी असे कधीच घडले नाही. कुणी तक्रार केली, असे आम्हाला सांगण्यात आले नाही,’ असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.