राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचे; कोकणाला रेडअलर्ट, उर्वरित महाराष्ट्रातही जोर’धार’ बरसणार


मुंबईः  राज्यात आता मान्सून जोर धरू लागला असून पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता असून आज शनिवारी मुंबईसह रायगड जिल्ह्याला तर उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेडअलर्ट देण्यात आला आहे.

राज्याच्या काही भागात १४ जून ते १९ जूनदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यासाठी आज शनिवारी रेडअलर्ट तर पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रात १४ आणि जून रोजी, मराठवाड्यात १७ जून रोजी तर विदर्भात १६ ते १९ जूनदरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. १३ ते १६ जूनदरम्यान कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात. ज्यामुळे नद्यांच्या काठांवर गैरसोय होऊ शकते. कदाचित स्थानिक पुरामुळे पूल झाकले जाऊ शकतात. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो, असे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने म्हटले आहे.

मंगळवारपर्यंत जिल्हानिहाय अंदाज असा

शनिवारी, १४ जूनः ठाणे, रायगड, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली जिल्ह्यात वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून रत्नागिरीला रेडअलर्ट देण्यात आला आहे.

पालघर, मुंबई, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक घाट, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

रविवार, १५ जूनः पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाट भागात एक दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई, धुळे, नंदूरबार, नाशिक, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

सोमवार, १६ जूनः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मंगळवार, १७ जूनः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सातारा घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी नको, लिंक शेअर करा!